विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहिरवगड - हा किल्ला सातारा जिल्ह्यांत पाटणच्या वायव्येस २० मैलांवर आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या एका शिखरावर बांधलेला असून त्याची १०० फूट लांबीची एक सोंड कोकणच्या बाजूकडे गेलेली आहे. पूर्वेच्या बाजूस जो तुटलेला कडा आहे तो व ही टेंकडी ह्यांच्यामध्ये ३० यार्ड लांबीची एक अरुंद डोंगराची ओळ आहे. वर सांगितलेला कडा ह्या ओळीवर ३०० फूट उंच आहे. टेंकडीचे क्षेत्रफळ सुमारे ५ मैल आहे व तिच्या पूर्वेस बहिरोबाचे देवालय आहे. या नावांवरून ह्या किल्ल्याला बहिरवगड असे नाव मिळाले आहे. किल्ल्याची हल्ली पडापड झाली आहे.