विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बागलकोट, ता लु का - मुंबई इलाखा. विजापूर जिल्ह्याचा नैर्ॠत्येकडील तालुका. क्षेत्रफळ ६८३ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) १२७४३४. मुख्य शहर बागलकोट. या तालुक्याची हवा इतर तालुक्यांपेक्षा चांगली आहे, व सरासरी वार्षिक पाऊस २४ इंच असतो.
गांव – हे घटप्रभा नदीच्या कांठी असून सदर्न मराठा रेल्वेचे स्टेशन आहे. लोकसंख्या (१९११) १७२९४. येथे व्यापार बराच चालतो. येथून ५ मैलांवर मुचकुंदी येथे शेतांनां पाणी देण्याकरिता मोठे तळे बांधलेले आहे.
पूर्वी हे गांव रावणाच्या पदरी असलेल्या गायनावादनपटु मंडळीच्या ताब्यात होते असे म्हणतात. सोळाव्या शतकांत विजयानगरच्या राजांकडे होते. स. १७५५ मध्ये पेशव्यांनीं सावनूरच्या नबाबाकडून हे गांव घेतले. स. १७७८ त बागलकोट हैदरकडे गेले होते. पण फिरून पेशव्यांकडे आले व त्यांनी स. १८१० निळकंठराव सर सुभेदाराच्या ताब्यांत दिले. त्याच्याकडून स.१८१८ त मनरो याने ते घेतले. पेशव्यांच्या वेळी येथे टांकसाळ होती. ती स.१८३५ त बंद झाली.