विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाघ - मध्यहिंदुस्थानांत, ग्वाल्हेर संस्थानच्या अमझेरा जिल्ह्यामधील एक खेडेगांव असून येथील बौध्द अवशेष प्रसिध्द आहेत. हे गांव वाघ किंवा बाघ व गिरणा यांच्या संगमावर आहे. दहाव्या शतकांत, राजा मोरधाज (मयूरध्वज?) याने हे गांव वसविले असे म्हणतात. त्याने बांधिलेल्या किल्ल्याचे अवशेष भाग अद्याप दिसतात. अठराव्या शतकांत हे गांव प्रथम पेशव्यांकडे व नंतर शिंदे सरकाराकडे गेले. येथून ४ मैलांवर असलेली लेणी पुराणवस्तुसंशोधनाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. सहाव्या किंवा सातव्या शतकांत, म्हणजे अजिंठा येथील गुहांच्या पूर्वी या गुहा तयार झाल्या असाव्यात.