विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाजी भीवराव रेटरेकर - हे देशस्थ घराणे पेशव्यांचे ॠणानुबंधी होते. भीवराव रेटरेकर व बाळाजी विश्वनाथ यांचा स्नेह असून, भीवरावास जे मुलगे झाले त्यांची नावेहि त्याने बाजीराव व चिमाजी अशीच ठेविली. बाजी हा पेशव्यांच्या सैन्यांत एक पथकी होता. तो १७३४ साली शिद्दीवरील लढाईंत, १७३७ सालच्या साष्टीवरील स्वारीत व १७३९ सालच्या तारापूरच्या मोहिमेंत होता. तारापूरच्या हल्ल्यांतच तो मारला गेला. त्यावेळी त्याच्या मातुश्रीस व भावास बाजीराव पेशव्यानी लिहिलेली पत्रे फार प्रेमळ आहेत. बापूजी बाजी नानासाहेबांच्या वेळी अनेक कामगिरीवर होता. नानासाहेबांच्या १७४१ सालच्या उत्तरेकडील स्वारींत बापूजी होता. नानासाहेबांच्या विरुध्द ताराबाई व दमाजी गायकवाड वगैरे असतां ज्या मंडळींनी दमाजीचा गेंडयाच्या माळावर पराभव केला त्यांत हा प्रमुख होता (१७५१). याच घराण्यांतील त्रिंबकराव हा रावबाजीच्या वेळी त्यांना साहाय्य करीत होता. (इति. संग्रह. पे. द. ३०, राजवाडे खं.३, भा.सं.प.या. ६०,१०३)