विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाण राजे - हे घराणे आंध्र देशाच्या पश्चिमेकडील कोलार जिल्ह्यातील प्रदेशावर राज्य करीत होते. हा प्रदेश म्हैसूरच्या पूर्वेस आहे. परंतु १५ व्या शतकाच्या शेवटी ह्या घराण्याचे वर्चस्व पालर नदीथडीवरील प्रदेशावर होते. ह्या घराण्याच्या राजधानीचे शहर वेलोरच्या दक्षिणेस असलेले पदवेदू असावे. ह्या घराण्याचा गंग वंशातील पहिल्या कोंगणीने पाडाव केला; परंतु ह्यानंतरहि ह्या घराण्याचे वंशज राज्य करीत होते. चोलवंशीय वीरनारायणाने ह्या घराण्याचा पुन्हा एकदा नाश केला; परंतु गंग वंशांतील केसरी हस्तिमल्लाने हे घराणे पुन्हा स्थापिले. हे घराणे १६ व्या शतकाच्या प्रारंभास बेतो अस्तित्वांत होते. पुढे गोपवंशीय राजांनी ह्या घराण्याचा समूळ नाश केला. १५ व्या शतकांतील प्राकृत भाषेचा प्रसिध्द व्याकरणकर्ता त्रिविक्रम हाहि यांच वंशांतील होता.