विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाबिलोन (आधुनिक हिला) - हे प्राचीन शहर युफ्रेटीस नदीच्या डाव्या तीरावर असून बगदादच्या दक्षिणेस ७० मैलांवर आहे. याल बैबल, सुआना, दिंतीर इत्यादि बरीच नावे आहेत. एच् विंक्लेअरच्या मते बाबिलोन हे नांव सारघन राजाने दिले व ती साम्राज्याची राजधानी केली. बाबिलोनचे पहिले घराणे व नंतर खमुरब्बीचे साम्राज्य (ख्रि.पूर्व २२५०) यांची राजधानी बाबिलोनच होती. पुढे बाबिलोनियाची राजधानी व पश्चिम अशियांतील पवित्र शहर या दृष्टीने बाबिलोनचे महत्त्व फार वाढले. ज्याच्या ताब्यांत बाबिलोन महत्व फार वाढले. ज्याच्या ताब्यांत बाबिलोन त्याच्या हातांत अशियाची सार्वभौम सत्ता अशी त्या काळी स्थिति असे, त्यामुळे पुष्काळांनी बाबिलोन आपल्या ताब्यांत घेण्याचा प्रयत्न केला. सेनाचेरीबला या बाबतींत अपयश आले. त्याच्या विरुध्द बंडे फार झाली. शेवटी राजधानीचा नाश होऊन बंडे कमी झाली. ख्रिस्त पूर्व ६८९ त येथील मंदिरे, इमारती व राजवाडे जमीनदोस्त करून त्यांतील सामान अराख्तूच्या कालव्यांत फेकण्यांत आले. पुढे सेनाचेरिबचा वारस असुर हेदन यानें पुन्हां शहर बसविण्यास सुरवात केली. याच्या मरणानंतर याचा मोठा मुलगा समास-सुम-युकिन याने आपला भाऊ असुरबनिपाल याच्याविरुध्द बंड केले. यावरून असुर लोकांनी बाबिलोनला वेढा दिला व शहरांतील लोकांची उपासमार करून शहर घेतले.
पुढे नेबोपोलोसरच्या अंमलाखाली बाबिलोनला स्वातंत्र्य प्राप्त झाले. याचा मुलगा नेबुकद्रेसर याच्या कारकीर्दींत बाबिलोन हे एक प्राचीन जगांतील अजब गोष्टींपैकी समजले जाई. पुढे शिकंदराने बाबिलोन जिंकून आपल्या ताब्यांत आणले. शेजारीच सेल्युशियाची स्थापना झाल्यामुळे बरेच लोक तेथे राहण्यास जाऊं लागले. त्या वेळेपासून बाबिलोनचा -हास झाला.
शहराचे बरेच अवशेष युफ्रेटीसच्या पूर्व किना-यावर आहेत. या शहराभोवती दोन तीन तट असत. या तटांची बरीच भपकेबाज वर्णने दिली आहेत. ए-सॅगिला मंदिराच्या जागेसंबंधी अजून एकमत नाही. मेरोडकाची मूर्ति सुवर्णाची होती.