विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बायकल सरोवर - पूर्व सैबिरियांतील एक सरोवर. आकारमानाने जगांतील हे सहावे मोठे सरोवर आहे. लांबी ३८६ मैल व रुंदी २० पासून ५० मैलांपर्यंत असून यांचे एकंदर क्षेत्रफळ १३२०० चौरस मैल आहे. प्राक्काली बायकल सरोवरचे क्षेत्र बरेच विस्तृत होते ही गोष्ट प्रमाणसिध्द आहे. आर्टिक समुद्राशी या सरोवराचा मिलाफ असे की काय यासंबंधी निश्चित सांगता येणार नाही. पश्चिम किना-यावर ''लिस्ट व्हिनिचो'' नावाचे मुख्य बंदर आहे. येथून पैलतीरावरील मिसो-ह्या बंदरापर्यंत आगबोटी चालतात. हिवाळयांत बर्फाच्छादन झाल्यावर आगबोटीच्या ऐवजी स्लेजगाडया वापरल्या जातात. स.१८६३-६४ मध्ये दक्षिण किना-यास लागून या दोन बंदरांमध्ये एक मोठी सडक तयार केली आहे. व अलीकडे (स.१९०५) आगगाडीहि चालू झाली आहे.