विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारबरी - पूर्वेस ईजिप्त, पश्चिमेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस साहाराचे वाळवंट व उत्तरेस भूमध्यसमुद्र यांनी मर्यादित झालेल्या उत्तर आफ्रिकेच्या एका भागाला बारबरी असे म्हणतात. या भागांत मोरोक्को, अल्जीरिया, ट्रिपोली, टयुनिशिया वगैरे राज्यांचा समावेश होतो. या भागांत बार्बर लोक राहतात. म्हणूनच यास बारबरी हे नांव पडले आहे.
या ठिकाणचे, विशेषतः किना-यावरील लोक फार पुरातन कालापासून चांचेगिरीचा धंदा करीत असत सतराव्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे यांच्या सद्दीची परमावधी होय. ज्यांचा सामाजिक दर्जा सध्या अतिशय वरिष्ठ असे जर्मन, इटालियन आणि इंग्रज व्यापारी त्यावेळी यांचे कैदी होते. श्रीमंतानां पैसे घेऊन हे सोडून देत व गरीबांना गुलाम बनवीत. स. १८३० त या लोकांचा चाचेगिरीचा धंदा समूळ बंद करण्यात आला.