विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारसिलोना - स्पेनमधील बारसिलोना प्रांताची राजधानी. येथील लोकसंख्या १९२३ साली ७६०५७२ होती. बारसिलोना हे स्पेनमधील भरभराटीत असलेले शहर असून भूमध्यसमुद्रावरील मुख्य बंदर आहे. या शहराचे जुने शहर व नवे शहर असे दोन भाग आहेत. पहिल्यांत पौरस्त्य पध्दतीवर इमारती बांधलेल्या आहेत व दुस-यांत इंग्लिश पध्दतीवर बांधलेल्या आहेत. शिक्षणसंस्थाची संख्या पूर्वीपासून पुष्कळ आहे. १४३० साली येथे विश्वविद्यालय स्थापण्यात आले. याशिवाय येथे सृष्टिशास्त्र, वैद्यकी व शंस्त्रक्रिया इत्यादिकांची विद्यालये असून बहिरे, मुके यांची शाळा व शिक्षणसंस्था आहेत. प्रथम बारसिलोना हे चांगले बंदर नव्हते परंतु पुढे त्यांत सुधारणा होऊन ते उत्तम बंदर झाले. पूर्वीपासून बारसिलोना हे व्यापाराचे व धंद्याचे स्पेनमधील मुख्य ठिकाण आहे. कापूस, रेशीम व लोकर यांचे सुत काढणे व विणणे हे येथील मुख्य धंदे आहेत. येथे 'टयूब' रेल्वे नुकतीच घालण्यांत आली आहे.