विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाराबंकी – संयुक्तप्रांत. फैजाबाद विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ १७५८ चौरस मैल. या जिल्ह्याची जमीन सुपीक, पाणी वाहून जाण्याची सोय चांगली, व पाण्याचा पुरवठा असून, लोक काटकसरी व उद्योगी असल्यामुळे हा जिल्हा चांगला भरभराटीस आहे. घोग्रा नदीशिवाय, गोमती व तिला मिळणा-या रेठ व कल्याणी या नद्या ह्या जिल्ह्यांतून वाहतात. घोग्रा नदीच्या कांठचे काही सखल प्रदेश सोडून इतर जिल्ह्याची हवा फार निरोगी आहे. वार्षिक पाऊस सरासरी ४० इंच पडतो.
इ ति हा स - या जिल्ह्याचा प्राचीन इतिहास अवगत नाही. अयोध्या प्रांताचा बहुतेक भाग काबीज करण्यापूर्वी मुसुलमानांनी हा प्रदेश घेतला होता. सय्यद सालर याने काही दिवस आपली राजधानी सत्रीख येथे केली होती. पंधराव्या शतकांत येथे जोनपूर व दिल्ली येथील राज्यांमध्ये लढाया सुरू होत्या. अकबराच्या राज्यांत हा जिल्हा अयोध्येच्या सुभ्यांतील लखनौ व अयोध्या या सरकारांमध्ये विभागला होता, व माणिकपूर अलाहाबादकडे होते. याच वेळी या जिल्ह्यांत आलेले रायवाड नावाचे लोक पुढे (१७५१ त) अयोध्येच्या नबाबाविरुध्द उठले पण त्याचा मोड झाला, व त्यांनां जहागिरीला पुष्कळ वर्षे मुकावे लागले. १९ व्या शतकाच्या प्रथमार्धांत, अयोध्येची राज्यव्यवस्था कमजोर झाल्यावर रायवाडांनी आपल्या सर्व जहागिरी परत मिळविल्या. स. १८५६ त हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यांत आला. १८५८ सालच्या बंडात हा जिल्हा सामील झाला होता. परंतु येथून फारसा अडथळा झाला नाही. लोकसंख्या जिल्ह्याची (१९०१) १०२९९५४ शेकडा ८३ हिंदु व शेकडा १७ मुसुलमान आहेत. येथे अवधी नावाची हिंदी भाषेची पोटभाषा चालते. शेकडा ४.८ पुरुषांना लिहितावाचता येते. तांदूळ, हरभरा व गहूं ही या जिल्ह्यांतील मुख्य पिके आहेत. कापसाचे कापड विणणे हा येथील मुख्य धंदा आहे. नबाबगंज येथे उत्तम चीट तयार होते. बहराम घाट येथे उंसाचे लोंखडी चरक करण्याचा कारखाना आहे. याशिवाय पितळेची भांडी, कुलुपे, अडकित्ते वगैरे जिन्नस एक दोन ठिकाणी होतात.