विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारी - ह्या जातीस देशपरत्वे सूर्यवंशी, सुरज, बारी, बरई, तांबोळी, पाटील, महाजन वगैरे नावे आहेत. सर्व हिंदुस्थांनात ह्या जातीची सुमारे १५ लक्ष लोकसंख्या असावी असा अंदाज आहे. हे लोक हिंदुस्थानाच्या सर्व भागांत तुरळक आहेत. त्यांत मुख्यत्वे व-हाडांत अंजनगांवबारी, वडनेरा, शिरसगाव, अंजनगांवसुरजी, वरुड व खानदेशांत जळगाव, शिरसोली, धुळे वगैरे ठिकाणी या जातीचा भरणा विशेष मोठया प्रमाणावर आहे. तसेंच मद्रास, मुंबई, पुणे, वसई, द्वारका वगैरे ठिकाणी हे लोक आहेत. तसेंच संयुक्तप्रांत, मध्यहिंदुस्थान, बंगाल, ओरिसा या प्रांतातूनहि हे लोक थोडयाफार प्रमाणानें आहेत.
या जातीत फार प्राचीन काळापासून आपसांतील तक्रारी पंचमार्फत मिटविण्याची वहिवाट आहे. पंचायतीस अध्यक्ष निवडीत नाहीत. वादाचा निकाल बहुमतानेंच होतो व कोणीहि पंच वंशपरंपरेने नसतो. ह्या जातीच्या फंडातून बहुतेक ठिकाणी पानाच्या व्यापा-यांकरिता धर्मशाळा, सराया वगैरे इमारती व जनावरांकरिता विहिरी, हौद (पाणपोया) वगैरे बांधलेले आहेत. कोठे कोठे जातीच्या फंडातून बागाइती जमिनीहि घेतलेल्या आहेत. या सर्व इमारतींवर जातींतील प्रमुख पंचाची देखरेख असते. जातीचे नियम उल्लंघन करणारांस दंड, बहिष्कार, पंचगव्यप्रायश्चित, क्षौर, जेवण लोटांगण वगैरे शिक्षा देतात.
या जातीचे काही बाबतीत माळी, देशमुख व राठोड वगैरे जातीशी थोडे फार साम्य आहे. ब्राह्मण, पंचाळ, सोनार याचें अन्न सर्व घेतात. कोठे तिरोळे कुणबी, कानडी, फुळमाळी, जंगम यांच्याहि हातचे अन्न खातात. या जातीपैकी कांही पोटभेद उपलब्ध आहेत ते येणेप्रमाणे - (१) सूर्यवंशीय, (२) गोलायत (३) भोय किंवा भोज (४) पुनम (पुण्यवान) (५) लिंगायत, (६) चव-यांशी (७) कुमार (८) खारे (९) त्रिकुटे (१०) गोंधळे बारी, यापैकी कोणत्याच जातीत परस्पर लग्नव्यवहार होत नाही. ब्राह्मणांकडून सर्व धार्मिक विधी होतात. क्वचित प्रसंगी ब्राह्मण नसल्यास जातीचे पंच बहुमताने विधी उरकून घेतात.
जातीविरुध्द अपराधांचा निकाल जात करते. धर्माविरुध्द अपराधाबद्दल ब्राह्मणांची संमति घेतात. कूपशुध्दी, पशुदोष, अशौच, वृध्दि वगैरे प्रसंगी शास्त्राधारे ब्राह्मण ठरवितील तो निकाल मान्य होतो तिथिनिश्चय ब्राह्मण करतात. इतर प्रसंगी जातीचे पंच देतील तो निकाल मान्य होतो. आपण मूळचे क्षत्रिय (सूर्यवंशीय) आहोत असे बारी लोक सांगतात.
गेल्या तीन-चारशे वर्षांपासून ह्या जातीचे स्थलांतर फारसे झाले नाही. या पूर्वी हे लोक पैठणाकडून खानदेश, व-हाडकडे आले तसे यांच्या वंशवळाच्या बाडांत लिहिलेले आहे. या जातीत पुनर्विवाहची चाल फार जुनी आहे. विधवेस पुनर्विवाह करणे भाग पाडितात तेव्हां त्यांच्या पोटापाण्याची निराळी तजबीज करावी लागत नाही. (रा. नारायण फकीरजी ताडे (अंजनगांव बारी) व डंकडाजी बापुनाजी तायडे (बडनेरा) यांजकडून आपलेल्या माहितीचा उपयोग केला आहे.)