विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बार्का (आधुनिक मर्ज) – आफ्रिका. हे सायरिनी देशांत ख्रि.पू. ६ व्या शतकाच्या मध्यांत वसविलेले प्राचीन शहर असून याची भरभराट फार लवकर झाली. सायरिनी शहराबरोबर याची स्पर्धा असून पश्चिमेकडील भागाला बार्काप्रांत म्हणत. हे नांव सध्या सर्व बेंगझीप्रांताला लावतात. दुस-या अर्सेसिलॉसच्या जुलमाना त्रासून पळून गेलेल्या ग्रीकांनी हे शहर वसविले असे म्हणतात परंतु साधारणतः हे लिबियन शहर होते. तिस-या अर्सेसिलॉसची आई फेरेटिमा हिच्या आमंत्रणावरून इराणी लोकांनी ६ व्या शतकांच्या अखेरीस हे शहर लुटून ब-याच कैद्याना बॅक्ट्रियांत नेले. टॉलेमीच्या अंमलाखाली याचा -हास होऊन टॉलेमीबंदराने याची जागा पटकावली. अरबांनी हा प्रांत जिंकल्यावर (इ.स.६४१) हे शहर सिरीनेकाची राजधानी बनले. आज मर्ज हे खेड असून राज्यकारभाराचे मुख्य ठिकाण आहे व येथे किल्ला व शिबंदी आहे. रोमन व अरब यांच्या वेऴचे कांही अवशेष आहेत. येथील तांबडी जमीन सुपीक आहे पण तिची मशागत चांगली होत नाही.