विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बार्लो, सर जॉर्ज (१७६२-१८४७) - ऍंग्लोइंडियन मुत्सद्दी व हिंदुस्थानचा एक जनरल. १८०५ साली लॉर्ड कॉर्नवालिस गाजीपूर येथे मृत्यू पावल्यामुळे, बार्लो यास त्याच्याजागी गव्हर्नर जनरल नेमण्यांत आले. ह्याने स्थानिक संस्थानिकांच्या भांडणांत न पडण्याचे धोरण सुरू करून चालू असलेली युध्दे एकदम बंद करुन तह केले. ह्याच्या वेळी झालेली विशेष गोष्ट म्हणजे वेलोर येथील शिपा यांचा दंगा (१० जुलै स. १८०६) होय. कर्नल गिलेस्पीने हा दंगा मोडून टिप्पूच्या कुटुंबातील मंडळीस कलकत्त्यास पाठविले. या वेलोरच्या बंडामुळे 'होम गव्हर्नमेंट' ने बार्लो यास गव्हर्नर जनरलच्या जागेवरून कमी करून, त्याच्या जागी 'बोर्ड ऑफ कंट्रोल' सभेचा अध्यक्ष लॉर्ड मिंटो याची नेमणूक केली. पुढे काही दिवस हा मद्रासचा गव्हर्नर होता. १८१२ साली, त्याचा कारभार पसंत न पडल्यामुळे त्यास विलायतेस बोलविण्यांत आले, (एन्स, ब्रिटानिका स्मिथ).