विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बार्शी, तालुका - मुंबई इलाखा, सोलापूर जिल्ह्यांतील तालुका. याच्या चोहो बाजूंस निजामाचा मुलूख असून याचें क्षेत्रफळ ५९७ चौरस मैल आहे. यांत दोन शहरे (बार्शी व बैराग) असून ३२१ खेडी आहेत. १९११ साली लोकसंख्या १३२८२५. जिल्ह्यांत सोलापूर तालुक्याखेरीज ह्याच तालुक्यांत लोकवस्ती फार आहे. तालुक्यांत लहान नद्या पुष्कळ असून, जंगलेहि बरीच आहेत. हवापाणी चांगले असून सोलापूर जिल्ह्यांतील इतर भागांपेक्षा येथे पाऊस नियमित व पुष्कळ पडतो.
गां व - हे व्यापाराचे मुख्य ठिकाण आहे. येथून कापूस, जवस, ज्वारी वगैरे माल मुंबईस व इतर ठिकाणीहि पुष्कळ जातो. ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे लाईनवर कुर्डुवाडी म्हणून स्टेशन आहे, व तेथून शहरापर्यंत १८९७ साली बार्शी लाईट रेल्वे सुरु करण्यांत आली येथे भगवानाचे प्राचीन देऊळ आहे. १८६५ साली म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथे कापडाच्या तीन गिरण्या आहेत.