विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाल्टिमोर - संयुक्त संस्थानांतील मेरीलॅन्डची राजधानी व एक बंदर. लोकसंख्या (१९२०) ७३३८२६. येथे रेल्वेची फांटे बरेच असून ऍटलांटिक महासागराच्या किना-यावरच्या मोठया बंदरांशी बोटीची रहदारी आहे. त्याचप्रमाणे यूरोपीय बंदराशींहि आगबोटीची रहदारी आहे.
येथील मुख्य इमारती म्हटल्या म्हणजे, सिटी हॉल, कोर्ट हाऊस, रोमन कॅथॉलिक कॅथिड्रल हॉपकिन्स हॉस्पिटल वगैरे आहेत. चार्लस रस्त्यांत जार्ज वाशिग्टनचा १९ फूट उंचीचा एक पुतळा उभारण्यांत आला आहे. याप्रमाणे दुसरेहि कांही पुतळे व स्मारके येथे आहेत. ड्रूईट हिल पार्क व क्लिफ्टन पार्क हे मुख्य बगीचे आहेत. बाल्टिमोर हे शिक्षणद्दष्टया फार महत्त्वाचे शहर आहे. येथील जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालय फार प्रसिध्द आहे.
पिबोडी म्हणून जी संस्था आहे तींत भौतिकशास्त्रांचा, वाङमयाचा व कलाचा अभ्यास होतो. मॉरगन कॉलेजात येथील नीग्रो लोकांस शिक्षण मिळू शकते. याशिवाय मेरीलँड व बाल्टिमोर विश्वविद्यालयांत उद्योगधंद्यांचे शिक्षण मिळूं शकते. येथे धर्मार्थ संस्था ब-याच आहेत.
येथील मुख्य व्यापार माशांचा आहे. याशिवाय गलबतें बांधणे, कपडे तयार करणे, डक नावांचा कपडा विकणे, दारू, तंबाखू लोंखडी सामान वगैरे बरीच कामे करण्याचे कारखाने येथे आहेत. सुकविलेली फळे येथे फार तयार करण्यांत येत असून त्यांचा खपहि फार होतो.