विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाल्तिस्तान – काश्मीरांत, लडखच्या वझीर वझारतच्या सत्तेखालील एक प्रदेश. याला लहान तिबेट असेहि म्हणतात. याच्या उत्तरेस मुझताघचे डोंगर व नगर, पूर्वेस लडख, दक्षिणेस काश्मीर, वरद्वान व झारकर, आणि पश्चिमेस गिल्झित व अस्तीर. या प्रदेशाच्या सभोवती डोंगर असून त्यांची उंची २५००० ते २८००० फूट पर्यंत आहे. सिंधू, शिओक, शिगर, द्रास, सुरू व शिगरला मिळणा-या ब्राल्डू व बशर आणि शिओकला मिळणा-या हुशे व सल्टरो या नद्या प्रदेशांतून वाहतात. येथे महत्त्वाची जंगले नाहीत. पाऊस थोडा म्हणजे वर्षास ६ इंच पडतो. हवा कोरडी व पुष्टिदायक आहे. बर्फ पुष्कळ वेळां पडते. खेडयांतील लोकांना शेतीकरिता त्याचा फार उपयोग होतो. थंडी फार असल्यामुळे नद्या गोठून जातात व त्यांचे नैसर्गिक रस्ते बनतात. वसंत व शरदॠतूंत हवा समशीतोष्ण असते. पण उन्हाळयांत काही ठिकाणी हवा अतिशय उष्ण असते.
इ ति हा स. - बाल्तिस्तानचे प्राचीन राजे (शियाल्पो) हे एका फकिराचे वंशज होते. त्यांच्यापैकी अल्लीशेर सर्वांत प्रसिध्द होता. त्याने लडख जिंकून स्कार्ड येथे किल्ला बांधला. अहंमरशहा हा यांच्यापैकी शेवटला स्वतंत्र राजा होय. १८४० साली त्याचा किल्ला, डोग्रा सेनापति झोरावरसिंग याने घेतला व तो स्वतः डोग्रासिंगाबरोबर तिबेटावर स्वारी करण्याकरिता गेला असतां, व्हासाजवळ कैदेत पडला व मरण पावला. हल्लीच्या बाल्तिस्तानच्या राजाला खरी सत्ता बिलकुल नाही, परंतु लोक त्याला अद्याप मान देतात.
बाल्ती व लडखी हे एकाच वंशाचे आहेत. त्यांची मुखचर्या मंगोलियन लोकांसारखी (गालाची हाडे उंच व कोप-याशी डोळे पुढे आलेले) आहे.
बाल्ती लोक सुस्वभावी, धीराचे व रंगेल आहत. बाल्ती लोकांनी इस्लामी धर्म स्वीकाल्यावर त्यांच्यांतील बहुपत्नित्वाची चाल बंद झाली. हल्ली बहुपत्नीत्वाची चाल प्रचारांत आल्यामुळे लागवड केलेल्या प्रदेशांत लोकसंख्या वाढत आहे. त्यांच्यामध्ये दारिद्रय बरेंच आल्यामुळे, पुष्कळ लोक मजुरीकरिता हिंदुस्थानांत येतात. राजा, बलती, सैयद, व ब्रुक्य या येथील जाती होत. येथील लोक तिबेटी भाषा बोलतात.
शे त की - पाऊस फार थोडा पडत असल्यामुळे येथील शेती पाटाच्या पाण्यावर अवलंबून असते. गहू, जव, वाटाणा, मसूर ही वसंतॠतूतील व पांढरा गहू, चीण, कंगणी ही शरदॠतूंतील मुख्य पिके होत.
या प्रदेशात सोने, आर्सेनिक, गंधक व तांबे हे खनिज पदार्थ सांपडतात. येथे व्यापार फारच थोडा चालतो. चहा, कापड, साखर, तांदूळ वगैरे जिन्नस बाहेरून येतात व फळे व गळ हे पदार्थ बाहेर जातात. दळणवळणाची साधने या प्रदेशांत चांगलीशी नाहीत. बाल्तिस्तान हे लडखच्या वझीर वझारतच्या सत्तेखाली असून त्याच्या हाताखाली स्कार्टू व कारगल या तालुक्यांवर तहशिलदार आहेत.