विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाळंतशेप - हिंदुस्थानामध्ये उष्णकटिबंधांत व त्याच्या जवळच्या प्रदेशांत होणारे झुडुप. याचा भाजीपाल्याप्रमाणे उपयोग होतो म्हणून व त्यापासून एक प्रकारचे औषधोपयोगी तेल निघते म्हणून पुष्कळदा याची लागवडहि करतात. साबणाला सुवास आणण्याकरिता त्याचा उपयोग करतात. याची फळे किंवा पाने आमटीत टाकल्यास तिला चांगला वास लागतो बाळंतशेप स्निग्ध व गोड असते. ती पानथरी, जंत व मूळव्याध हे रोग घालविणारी व क्षयरोगात हितकारक आहे. ही वृष्य, बलकारक व वात आणि कफ यांस घालविणारी आहे.