विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाळाजी आवजी चिटणवीस - बाळजी आवजीचे वडील आबाजी हरी मुजुमदार उपनाम चित्रे. हे सुमारे ११ वर्षांपर्यंत जंजि-याचा बाबजीखान हबशी याचे मुख्य कारभारी होते. इ.स. १६३५ च्या सुमारास बाबजीखान अत्यवस्थ असता आबाजीचे बंधु खंडोबा 'बाबजीखान उदर्ईक मरेल' असे बोलले बोल फळास गांठ पडली, व आबाजीच्या शत्रूंनी 'बाबजीखानास खंडोबानी आपले जे कुलदैवत खंडेराय त्याच्या साहाय्याने कुडे करून मारिले असे बेगमांच्या व त्याच्या पुत्राच्या मनांत भरवून दिले. त्यामुळे आबाजीवर सर्वांचा रोष झाला व त्याला 'आमुचे चित्ती ती स्वामीभक्ति एक ' हा एकच मंत्र जपीत दिलेला विषाचा पेला सेवन करावा लागला. नंतर आबाजी व खंडोबा यांनी पोत्यांत घालून समुद्रांत फेकून दिले व आबाजीची पत्नी रघुमाई किंवा बुलगाई हिला व तिचे पुत्र बाळाजी, चिमाणाजी व शामजी अशा चौघास गुलाम म्हणून दूर नेऊन विकण्यास आज्ञा झाली. घरदार जप्त करून जाळपोळ केली. परंतु या चौकडीला तारवांतून नेत असता वादळ झाले व खलाश्यांना जीव वांचविण्यास राजापुरी शिरावे लागले. वादळ झाल्याने खलाश्यांनीहि बुलगाईजवळ फार कोपिष्ट देव आहेत अशी भीति वाटली व त्यांनी त्यांस २५ होनांस बुलगाईच बंधु विसो व लिंगो शंकर तुंगारे टिपणिशीवर होते त्यास विकले. येथेहि शिद्दी याचा थोडाबहुत अंमल असल्यामुळे या चौकडीला अज्ञातवासच भोगावा लागला. मामानी या तीनहि मुलांची चागची संगोपना केली व ती मोठी होताच बाळाजीला राजापूरच्या कसबेदारापाशी शिकण्यास ठेविले. बाळाजी जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याला अज्ञातवासाचा कंटाळा वाटूं लागला. इतक्यात म्हणजे स.१६४७-४८ च्या सुमारास शिवाजीने जी नवीन क्रांति घडवून आणण्याची घामधूम सुरू केली होती ती त्याच्या कानी आली व बाळाजीला शिवाजीस जाऊन मिळावेसे वाटले परंतु तसे करणे तितकेंच धोक्याचे व कठिण होते. नंतर इ.स. १६४८ त शिवाजीने राजापूराकडे मोहीम करण्याचे ठरविले. ते ऐकून तेथील कसबेदारांनी जी काही सामोपचाराची पत्रे पाठविली त्यातच बाळाजीनी शिवाजीला एक गौरवपर पत्र लिहून आपला मनोदय कऴविला. त्या पत्रातील अक्षर, लेखनकौशल्य व विशेषतः कळकळ पाहून शिवाजीने राजापुरास आल्यावर मुद्दाम बाळाजीचा शोध केला व त्याला, त्याचे बंधू व मातोश्रीसह आपल्याबरोबर घेऊन गेला. बाळाजीची व त्याच्या बंधूंची सेवा पाहून शिवाजीने बाळाजीस ता. १६ आगष्ट स. १६६२ रोजी चिटणिशी दिली व चिमणाजी व शामजीस खासगीकडे कारभार सांगितले. बाळाजीस नेहमीच शिवाजीबरोबर रहावें लागे, त्यामुळे त्याला स्वतंत्रपणे मुलुखगिरी करता आली नाही. शिवाजीस इ.स. १६६६ त आग्रयास कैद केले तेव्हा बाळाजीनेही सुटकेकरिता बरेच प्रयत्न केले. तसेच सर्वच महत्त्वाच्या कागदपत्रावर चिटणिशी दरख व्हावयाचा असल्याने बाळाजीला विशेषच धोरणाने वागावे लागे. बाळाजीवर जशी मुख्य राजकीय दफ्तराची जबाबदारी होती तसेच त्याच्यावर नेहमी नाजूक वकिलतीचेहि काम करण्याची विशेष प्रसंगी जबाबदारी येई व ती तो नेहमीच सफाईने पार पाडी. विशेषत: मोंगल व इंग्रज यांच्याकडील राजकारणे बाळाजीनेंच साधली. बाळाजीच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल व एकनिष्ठतेबद्दल शिवाजीची जंजिराप्रकरणी तर चांगलीच खात्री होऊन चुकली. परंतु बाळाजीच्या शिवाजीजवळील निकट सहवासामुळे व विशेषतः सर्वच राजकीय बाळाजीजवळच राहिल्याने इतर सरकारकून मंडळीत व विशेषतः सोयराबाईच्या मनांत त्याच्याबद्दल द्वेष उत्पन्न झाला व बाळाजीवर विषप्रयोग करण्याचा कटहि रंगला. परंतु तो शिवाजीने युक्तीने मोडून टाकला. बाळाजीला ता. १३ ऑक्टोबर स. १६७३ रोजी पालखीचा सन्मान मिळला. बाळाजीचा अशाप्रकारे झालेला परामर्ष व तारीफ सहन न होऊन त्याच्यावर ग्रामण्य उभारून त्याला अक्षत्रिय बनविण्याचा जोराचा प्रयत्न झाला परंतु बाळाजीने त्या सर्वांचे निवारण करून शिवाजीसहि राज्यभिषेक करविला. बाळाजीस शिवाजीने मुख्यप्रधानपद देण्याचे ठरविले. परंतु बाळाजीने प्रधानपद स्वीकारून एखाद्या भागाचा कारभार पाहून स्वामिसेवा करण्यापेक्षा चिटणविशीच करून मुख्य व सर्वच राज्यसूत्रे आपल्या हाती ठेवून निरभिमानी व निस्वार्थी स्वामिसेवा व देशसेवा करण्याचा हट्ट धरिला. बाळाजीची लेखनशैली इतकी साधी, स्पष्ट व पूर्ण असे की, त्यामुळे राजकीय हुकुमांत कधीहि घोटाळ उडत नसे. काम करण्याची धर्तीहि त्याच प्रकारची होती. त्याच्या दूरदर्शी व चाणक्षबुध्दीवरून विजापूरकर, भागानगरकर व मोंगल याच्याकडून त्याला फितवण्याचे नेहमी प्रयत्न होत असत. परंतु ते नेहमी निष्फळ ठरत सोयराबाइच्या कटाविरुध्द मात्र त्याने जितक्या नेटाने खटपट केली तितक्याच जोराने सोयराबाईच्या लोकांनी व नंतर कलुशा व दादप्रभु यांनीहि चिटणिशी राज्यकारभार आपल्या हातांत आणण्यासाठी त्याला छळले. रायगडी आल्यानंतर संभाजीने बाळाजीला जितक्या मानाने वागविता येईल तितक्या मानाने वागविले व कारभारहि तसाच घेतला. इंग्रजाकडील राजकारणहि बाळाजीने तसेंच पुढे चालविले. परंतु संभाजीच्या राज्यारोहणानंतर अनाजी व सोयराबाई यांनी जो दुसरा विषप्रयोगचा कट केला त्यांत बाळाजीला कलुशा व दादजी रघुनाथ यांनी खोडसाळपणानें गुंतवून संभाजीस खोटेंच सांगून त्याला मारण्याची अर्धवट आज्ञा घेतली, व बाळाजी, त्याचा भाऊ चिमणाजी व पुत्र आवजी यांस परळीखालीं स. १६८१ च्या आगष्टांत ठार मारलें बाळाजीची स्मृति फारच तीव्र होती. तो एखादें लांबलचक पत्र एकदां ऐकूनहि दोन तीन वेळां सहज बिनचुक म्हणून दाखवी. राजकारणांत तो फारच दक्ष होता व त्यानें राज्यकारभाराचा गाडा सावधगिरीनें व सफाईनें हांकल्यामुळें तो शिवाजीचा एक हात होऊन राहिला होता. मराठयांच्या इतिहासांत एकनिष्ठेचें पहिलें उदाहरण जसें बाळाजी आवजी आहे तसेंच मोडीलेखनांत सुबोध व स्पष्ट वळणाचाहि आद्यमान बाळाजीकडे आहे (वा.सी. बेंद्रे.)