विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिक्वेरल - बिक्वेरल नांवाच्या फ्रेंच कुळांतील तीन पुरुषांनी शास्त्रीय क्षेत्रांत बरेंचसें कार्य केलें आहे.
बि क्वे र ल अ न्टो नी सी झ र (१७८८-१८७८) - यानें विद्युत आणि चुंबक या दोन शास्त्रांत मन घातलें. सन १८३७ मध्यें त्याला रॉयल सोसायटीकडून 'कोपले' पदक बक्षीस मिऴालें. यानें पुष्कळ पुस्तकें लिहिली आहेत. प्राणिज उष्णता, सेंद्रिय रसायनशास्त्र, वनस्पतिविषयक रसायनशास्त्र आणि हवामानशास्त्र इत्यादि विषयांवर यानें बरींच पुस्तकें लिहिलीं आहेत.
बि क्वे र ल अ ले क्झां ड र ए ड म न्ड (१८२०-१८९१) - अलेक्झांडर बिक्वेरल यानें स्वतः प्रकाशशास्त्र, सूर्यप्रकाशाचें पृथक्करणशास्त्र व सूर्यप्रकाशाचा कलेच्या दृष्टीनें उपयोग, विद्युत्प्रकाशाविषयी संशोधन आणि सल्फाइड नांवाच्या रासायनिक द्रव्यापासून आणि युरेनियमजन्य रासायनिक द्रव्यापासून निघणा-या प्रकाशाविषयीं संशोधन इतक्या विषयांवर स्वतःच परिश्रम घेतले. तसेंच चुंबकशास्त्राच्या कांही अंगांसंबंधानें यानें परिश्रम घेतले आहेत.
बि क्वे र ल हे न री अ न्टो नी (१८५२-१९०२) - रेडियमसदृश किरणें युरेनियम नांवाच्या धातूपासून निघतात असें यानें प्रथमतः दाखवून दिलें. हीं किरणें रान्ट जेन किरणांसारखीं असतात असें यानें सिध्द केलें. हा शोध त्यानें १८९६ सालीं लावला. या शोधाबद्दल त्याला आणि पेरीक्युरी या दोघांनां मिळून सन १९०३ मध्यें नोबलप्राइझ देण्यांत आलें. चुंबकत्व, प्रकाशाचें ध्रुवीभवन व स्फटिकाकडून प्रकाशाचें अपशोषण इत्यादि विषयांसंबंधानें त्यानें बरेच परिश्रम घेतले होते.