विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिजनोर, जिल्हा. - संयुत्तप्रांतांत बरेली भागांतील हा एक उत्तरेकडील जिल्हा आहे. यांतून गंगा, मालिनी (पाखालच्या टेंकडयांत उगम) कोह या नद्या वहात जातात. कोहराम गंगेस मिळते. ईशान्य सीमेवरील खडकाळ भाग सोडून बाकीचा भाग गंगेच्या गाळाचा झालेला आहे. या जिल्ह्यांत आंब्यांच्या बागा व कुरणें फार आहेत. गंगेच्या व रामगंगेच्या कांठी काळवीट, रानडुक्कर, तरस आढळतात. टेंकडयांतून पावसाळयांत हत्ती सखल प्रदेशांत येतात. बदक, पाणलावा, तित्तर, वगैरे पक्षी येथील जंगलांत आहेत. हिमालयाच्या सान्निध्यामुळें येथील हवा थंड व चांगली आहे. पाऊस सुमारें ४४ इंच पडतो.
इतिहास - बिजनोर वेन राजानें वसविलें असें म्हणतात. ह्युएनत्संग हा प्रवासी जेव्हां या भागांत आला त्यावेळी येथें एक राज्य होतें. त्याची राजधानी सध्याच्या मंडावर गांवी होती. तैमूरलंगानें हा प्रांत उध्वस्त करून टाकिला होता. अकबराच्या वेळीं हा भाग दिल्लीच्या सुभ्यांत मोडत असे. मोंगल राज्यास जेव्हां बरीच उतरती कळा लागली तेव्हां या भागांतील पठाण स्वतंत्र झाले. त्यांचा पुढारी अल्ली महंमद होता. त्यानें हा प्रांत १७४८ च्या सुमारास घेतला व याचा उत्तर भाग नजीबखान नामक सरदारास बहाल केला. हाच सरदार नजीबउदौला म्हणून इतिहासांत प्रसिध्द आहे. मराठयांनी या भागांत याच सुमारास स्वा-या केल्या. १७७४ सालीं रोहिल्यांची सत्ता नाहीशी होऊन, हा प्रांत अयोध्याप्रांतांत सामील करण्यांत आला. १८०१ सालीं अयोध्येच्या नवाबानें इंग्रजांस हा मुलूख तोडून दिला.
या जिल्ह्यांत १६ मोठीं गांवें व २१३० खेडीं आहेत. लोकसंख्या (१९२१) ७४०१८२. यांतील शेंकडा ६४ हिंदु व ३५ मुसुलमान असून भाषा हिंदी आहे. मुख्य पिकें भात, गहूं, यव, बाजरी, हरभरा, ऊंस हीं आहेत.
या जिल्ह्यांत गूळ आणि साखर हे मुख्य व्यापाराचे जिन्नस आहेत. यांखेरीज दोराखंड व काचेची भांडी वगैरे सामान तयार होतें. निर्गत माल साखर, गूळ, व आयात माल हरभरा, मीठ, कापड, धातू हा असून सेओहारा, धामपूर, नागीण, नजीबाबाद हीं व्यापाराचीं गांवे आहेत. औधरोहिल खंड रेल्वे या जिल्ह्याच्या मधून जाते. नजीबाबाद ते कोटदुवारापर्यंत एक फांटा वेगळा आहे. साक्षरतेचें प्रमाण शेंकडा २ आहे.
त ह शी ल - हींत बिजनोर, दारानगर, भंडावर, चांदपूर, बासा हे परगणे आहेत. लोकसंख्या (१९११) २११६०७. खेडी ५७२ व बिजनोर, मंडावर, झालु, हालदौर इत्यादि मोठी गांवें आहेत. हिच्या पश्चिमेस गंगा नदी आहे.
गांव - हें या जिल्ह्याचें मुख्य गांव नागीणपासून १९ मैलांवर आहे. हें वेन राजानें वसविलें अशी आख्यायिका लोकांत प्रसिध्द आहे. सतराव्या शतकांत हें जाट लोकांचें एकत्र होण्याचें ठिकाण होतें. त्यावेळी त्याचें मसुलमान लोकांशी वैर होतें. हें गांव गंगेपासून ३ मैलांवर आहे. १८६६ सालीं यथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें चाकू कात-या तयार होतात.