विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिझान्शिअम - प्राचीन यूरोप. बॉसपरसच्या किना-यावरील ग्रीसमधील प्राचीन शहर. हें अर्वाचीन कॉन्स्टांटिनोपल ज्या टेंकडयांवर आहे त्या टेंकडयाच्या पूर्व टोंकास वसलें आहे. हें मेगोरियन आणि आर्गाईव्ह या लोकांनी ख्रिस्तपूपर्व ६५७ च्या सुमारास वसविलें असें सांगतात. या शहराची मूळ रचना फार सुंदर असून सुरक्षित होती. येथें एकाच प्रकारचे लोक नसून अथेन्स व लासीडेमोनिया येथील लोकांची भेसळ झालेली होती. अर्थातच या दोन जातींत या शहराच्या मालकीविषयी तंटेबखेडे उपस्थित होत. आज अथेन्सच्या हाती तर उद्यां स्पार्टाच्या ताब्यांत याप्रमाणें या शहराची कांही काळ स्थिति होऊन ख्रिस्तपूर्व ३९० च्या सुमारास अथेन्सनें येथें आपली लोकसत्ताक राज्यपध्दति सुरू करून बापला अंमल बसविला.
फिलिप ऑफ मॅसिडॉनच्या जबडयांतून बिझान्शिअमला सोडविण्याचा अथेन्सनें आटोकाट प्रयत्न केला व तो त्यावेळी सिध्दीसहि गेला पण फिलिपचा मुलगा अलेक्झांडर याच्या पुढें मात्र हार खाऊन बिझान्शिअमला अलेक्झांडरचें स्वामित्व कबूल करावें लागलें. मॅसिडोनियन राज्याचा नाश झाल्यावर या शहरानें पुनरपि आपलें स्वातंत्र्य मिळविलें. सिथियन लोकांच्या स्वा-यांमुळें खजिन्यांत तूट पडूं लागली व गॉल लोकांच्या स्वा-यांमुळें ती अधिकच भासूं लागली, तेव्हां बॉस्परसमधून जाणा-या येणा-या प्रत्येक जहाजावर ते कर लादूं लागले, त्यामुळें -होडियनांशी युध्द उपस्थित होऊन त्यांत बिझान्शिअम येथील लोकांचा पराभव झाला.
यानंतर बिझान्शिअमनें रोमशीं संधि केला पण त्यापासून त्याचा कांही एक नफा न होतां उलट स्वातंत्र्य गमावून तें रोमची एक वसाहत होऊन बसलें. इसवी सन १९६ त सीव्हेरस यानें शहर उध्वस्त करून बरेचसे लोक तरवारीला बळी दिले. पुन्हां त्याच्याच कृपेनें शहराचा उध्दार होतो न होतो तोंच फिरून त्यावर गालीइनसची अवकृपा होऊन रहिवाशांची कत्तल व शहराची होळी करण्यांत आली. परंतु चमत्कार हा की येवढा जोराचा आघात बसला असतांहि पुन्हां बिझान्शिअम अल्पावधींतच विलक्षण सुधारलें, तें इतकें कीं दुस-या क्लाडिअसच्या राज्यांत झालेल्या गॉथ लोकांच्या स्वारीचा तें उत्तम प्रतिकार करूं शकलें. इ. सनानंतर ३३० त कान्स्टन्टाईन बादशहानें जुन्या शहराच्या जागेवर नवीन शहर वसविलें व आपला सर्व राज्यकारभार तो तेथूनच चालवूं लागला. प्राचीन इतिहासकारांनी बिझान्शिअमच्या रहिवाशांचे वर्णन केलें आहे. ते असें - हे लोक आळशी असून आपला सर्व वेळ दारू पिण्यांत व चैनबाजींत घालवीत असत, युध्द म्हटलें कीं त्यांनां दरदरून घाम सुटत असे. ख्रिस्ती धर्माचा शिरकाव येथें सेंट ऍंड्रयू यानें केला असें अर्वाचीन ग्रीक लोकांचें म्हणणें आहे. बिझान्शिअम साम्राज्याची माहिती ज्ञानकोशाच्या चवथ्या विभागांत दिली आहे.