विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिनामी व्यवहार - आपल्या पैशानें कोणी इसम आपल्या करितां फक्त दुस-याच्या नांवानें मिळकत विकत घेतो तेव्हां त्या व्यवहारास बिनामी व्यवहार असें म्हणतात. जो त्या मिळकतीची किंमत देतो त्याचें खरें प्रभुत्व असतें व बाहेरच्या देखाव्याकरितां खरेदीखत दुस-याच्या नांवे केलेलें असतें.
बहुतकरून असले व्यवहार, सावकाराच्या धाकानें मिळकतीचा बचाव व्हावा म्हणजे ती जप्त होऊन विकली जाऊं नये म्हणून होतात. कधीं कधीं कोर्टाची परवानगी न घेतां सावकार लोक आपल्या गुमास्त्याच्या नांवानें लिलावांत मिळकती खरेदी करतात. किंवा एखाद्या नातलगाच्या नांवानें घेतात. ज्याच्या नांवानें अशी मिळकत खरेदी केलेली असते त्याचा व ख-या मालकाचा विश्वासाचा संबंध असतो. बिनामी व्यवहार करण्याची चाल हिंदु लोकांत इतकी आहे कीं ती एक रूढीच बनली आहे व तिला शास्त्राची योग्यता आली आहे.
एखाद्या कायद्याचें उल्लंघन करण्यास किंवा बिनामीदारापासून मोबदला देऊन बेचन घेतलेल्या प्रामाणिक मनुष्याचे हक्क नष्ट करण्यास किंवा सावकारास फसविण्याच्या इराद्यानें असा व्यवहार करून त्यायोगें त्यास फसविलें असेल, तेव्हां तो व्यवहार बिनामी आहे असें प्रतिपादन करतां येत नाहीं. कारण स्वतःच्या लबाडीचा फायदा कोणास घेतां येत नाहीं.(१८ मुं. ३७२ व २२ मुं. ६७२).
परंतु बिनामी व्यवहार लबाडी करण्याच्या किंवा कोणास फसविण्याच्या अगर अन्यायानें फायदा घेण्याच्या इराद्यानें केलेला नसतो त्यावेळीं हा व्यवहार बेकायदेशीर नसतो. ज्याच्या नांवे मिळकत खरेदी केली असेल तो (इंफ्लाइडट्रस्टी) अप्रत्यक्ष ट्रस्टी समजला जातो.(२३ मुं. ४०६ व २२ मुं. ८२०)
ज्याच्या नांवे मिळकत विकत घेतली असेल तो इसम बदलला व मिळकत आपलीच आहे असें म्हणूं लागला तर ख-या मालकाला फिर्याद आणतां येते. परंतु ख-या मालकाच्या पैशानें ती मिळकत विकत घेतली आहे हें शाबीद करण्याचा बोजा त्याच्यावर आहे. (५ मुं. लॉरिपोर्टर ७८४; २९ मुं. ३०६). हुकुमनाम्याच्या बजावणींत कोर्टमार्फत मिळकतीची विक्री होते व लिलावाचा दाखला देण्यांत येतो, तेव्हां ज्याच्या नांवे लिलावाचा दाखला तो मालक नाहीं हें दाखविण्यास मालक म्हणणारास फिर्याद आणतां येत नाही. तसेंच थकलेल्या शेतसा-याच्या रकमेकरितां मिळकत विकली गेली ती ज्याच्या नांवे खरेदी झाली तो मालक नाही हें दाखविण्याची, मालक म्हणणारास फिर्याद आणतां येत नाही. तथापि तिस-या (त्रयस्थ) माणसास खरा मालक कोण आहे हें दाखवितां येतें.
बिनामीदार हा फक्त नामधारी आहे असें माहीत असून त्याच्याशीं कोणी गहाण-खरेदीचा व्यवहार करील तर तो प्रामाणिकपणाचा नाहीं म्हणून रद्द होईल, परंतु ज्यास हें माहीत नाहीं अशा माणसानें इमानानें मोबदला देऊन त्याच्यापासून मिळकत खरेदी केली तर तो व्यवहार रद्द होणार नाहीं. अशा वेळी बिनामदार खरा मालक नाहीं हे दाखविण्याची ख-या मालकास पुराव्याच्या कायद्याचें कलम ११५ प्रमाणें बंदी आहे. (प्रि. का. ६ मु. इं. आ. ५३, ७२, ७४).
एकत्र हिंदु कुटुंबात कोणीहि सहभागीदाराच्या नावें मिळकत खरेदी घेतली असली तरी एकत्र कुटुंबाची असते. कारण ती समाईक कुटुंबाच्या पैशानें समाईक कुटुंबाकरितांच घेतलेली असते. हिंदु बापानें आपल्या मुलाच्या किंवा बायकोच्या नांवाने मिळकत खरेदी घेतली असली तर ती त्याच्या करितां घेतली आहे व ती त्यांच्या मालकीची आहे असें अनुमान नाही. अशा रीतीनें व्यवहार करण्याची फार पुरातन चाल हिंदु लोकात आहे. परंतु बिनामी व्यवहार हा खरोखर इक्विटीच्या तत्त्वाप्रमाणें इंप्लाईड ट्रस्ट-म्हणजे अप्रत्यक्ष रीतीनें केलेला ट्रस्ट-आहे. या व्यवहारांत मूळ हेतु सफल करणें व कपट विफल करणें व कपटी लोकांस आपल्या कपटाचा किंवा लबाडीचा फायदा घेऊन कोणाचें नुकसान करता न येणें ही गोष्ट मुख्य आहे.
एकत्र हिंदु कुटुंबाची अविभक्त मिळकत सर्वाची समाईक आहे असें अनुमान आहे. या कुटुंबांतील कोणी एखादा इसम त्यांपैकी कांही भाग एकटयाच्या मालकीचा आहे असें म्हणेल तर तें शाबीद करण्याचा बोजा त्याच्यावर आहे. एकत्र कुटुंबांत बापानें मुलाच्या नांवें मिळकत खरेदी घेतली तर ती खरेदी बिनामी आहे असें अनुमान करावें व ती मिळकत याच्या मालकीची आहे असें मुलानें शाबीद केलें पाहिजे.(प्रि. का. मू. इं. आ. ५३, ७२, ७४).
कोणा हिंदूनें (किंवा मुसुलमानानें) मुलाच्या नांवें मिळकत खरेदी केली असेल व सावकार ती मिळकत बापाच्या कर्जास किंवा समाईक कुटुंबाच्या कर्जास जबाबदार आहे असें म्हणत असेल व ती त्याकरितां जप्त करील तेव्हां ती मिळकत मुलाच्या खासगी मालकीची आहे हे निर्विवाद शाबीद करण्याचा बोजा हरकतदार मुलावर आहे.(६ मुं. ७१७).