विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिब्बा - याला भेला, भिलावा, कोंकी इत्यादि नांवे आहेत. सतलज नदीपासून पूर्वेस ३५०० फूट उंच हिमालय पर्वताच्या लगतच्या प्रदेशांतील व पूर्वेस असामपर्यंतच्या हिंदुस्थानच्या उष्ण भागांतील हें एक नियमित काळी फळें, पुष्पें, व पानें गळणारें झाड आहे. या झाडाच्या बुंध्यास खांचा पाडल्यानंतर त्यांतून एक प्रकारचा तिखट, चिकट रस निघतो. याचें वार्निश बनवितात. परंतु या झाडापासून उत्पन्न होणारा अतिशय महत्त्वाचा पदार्थ म्हटला म्हणजे याचें फळ होय, यांतील बियांवरील तिहेरी वेष्टनांत एक कडु व अतिशय तुरट पदार्थ असतो. याचा हिंदुस्थानांत निशाणी करण्याच्या शाईसारखा सार्वत्रिक उपयोग करतात, यामुळें कापसाच्या कापडास काळा रंग बसतो. उपयोग करण्यापूर्वी यांमध्यें रंग पक्का बसण्याकरितां चुन्याची निवळी मिसळली पाहिजे. बंगालप्रांताच्या भागांत नुसत्या फळांचा अथवा तुरटीमिश्रित फळांचा रंग म्हणून उपयोग करतात, व संबंध हिंदुस्थानांत देशी औषधांतील हा एक महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. बिब्याचीं फुलें व गोडंबी खातात.