विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिलासपूर, जि ल्हा. - मध्यप्रांत. छत्तिसगड विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ७६०२ चौ. मैल. छत्तिसगडच्या सपाट प्रदेशाचा उत्तर भाग ह्या जिल्ह्यानें व्यापलेला आहे. ह्या जिल्ह्यांत एकंदर १० जमीनदा-या आहेत; त्याचें क्षेत्रफळ २००० चौरस मैल आहे. शिवनाथ नदी बिलासपूर तहशिलीच्या दक्षिण भागांतून वहात जाऊन महानदीस मिळते. ह्या जिल्ह्यांत कोर्व्याच्या कोळशाच्या खाणी आहेत. जंगलांतून बहुतेक ताडवृक्ष आहेत. पश्चिम भागांत कोठें कोठें सागवान आढळतें. मातिन व अपरोराच्या जंगलांत रानटी हत्ती सांपडत असत. हवामान मध्यप्रदेशांतील इतर जिल्ह्यांप्रमाणेंच आहे. पाऊस ५० इंच पडतो.
इतिहास - ह्या जिल्ह्यांच्या इतिहासाचा व रत्नपूरच्या व रायपूरच्या हैहयवंशीं रजपूत राजांचा प्राचीन काळापासून निकट संबंध आहे. ह्या वंशाचा पहिला राजा, श्रीकृष्णासह अर्जुनाचा घोडा चोरणारा मयूरध्वज होता असें म्हणतात. ह्या वंशाच्या राजाच्या राज्यांत ३६ गड आहेत, ह्यावरून छत्तिसगड हें नांव पडलें. प्रत्येक गडाभोंवती असलेल्या आसमंतांतील प्रदेशावर व गडावर एखाद्या नायकाची नेमणूक असे. सध्यांच्या जमीनदारांपेकी कांहीं जण त्यांचेच वंशज होत. सन १००० च्या सुमारास सुरदेव राजा गादीवर आला तेव्हां छत्तिसगडच्या प्रदेशाचे दोन तुकडे पाडण्यांत आले. कनिष्ठ भावानें रायपूर ही आपली राजधानी केली व ज्येष्ठानें रत्नपूर आपली राजधानी केला. अशा रीतीनें छत्तिसगडच्या राज्याचे दोन विभाग व वेगऴी वेगळीं दोन घराणी झालीं. कल्याणशाही राजानें स. १५३६ ते १५७३ पर्यंत राज्य केलें.
ह्याच्या कारकीर्दीत मुसुलमानी अंमल छत्तिसगडच्या प्रदेशांत पसरला. हा राजा दिल्लीस गेला व अकबराची भेट घेऊन ८ वर्षांनीं परत आला. त्यावळचें रजपूत संस्थानाचें उत्पन्न ९ लाख रूपये होतें व कल्याणशाहीचें सैन्य १४२०० शिपाई, १००० घोडेस्वार व ११५ हत्ती इतकें होतें. ह्या सैन्याचा उपयोग बहुतेक संस्थानांतील व्यवस्था ठेवण्याकडे होत असे. इ. स. १७४१ मध्यें छत्तिसगडावर मराठा सेनापति भास्करराम ह्यानें स्वारी केली. त्यावेळी येथील राजा रघुनाथसिंग हा वृध्द व दुर्बल झालेला असल्यामुळें त्यानें कोणत्याहि त-हेनें मराठयांस प्रतिकार केला नाहीं. तेव्हां मराठयांनीं राजधानीस वेढा देऊन ती सर केली. पुढें नागपूरच्या भोंसल्यानीं छत्तिसगडचा कारभार दोन अधिका-यांवर सोंपविला होता. ह्याची व्यवस्था १८१८ सालापावेतों मराठे सुभेदारांनीं पाहिली. आप्पासाहेबास गादीवरून काढून टाकण्यांत आल्यानंतर हा प्रदेश ब्रिटिश अधिका-यांच्या ताब्यांत आला. याच सुमारास रत्नपूरच्या ऐवजी रायपूर हें राजधानीचें शहर झालें. अज्ञान राजा वयांत आल्यानंतर येथें मराठी अंमल १८५३ सालापावेतों होता. १८५३ साली छत्तिसगड ब्रिटिश राज्यास जोडण्यांत आला.
बिलासपूर गांवाच्या उत्तरेस १५ मैलांवर रत्नपूर आहे.जिल्ह्याच्या दक्षिणभागीं सिओरी नारायण व खरोड हीं बाराव्या शतकांतील देवालयें आहेत. येथील लेखांत रत्नपूरच्या राजांचा उल्लेख आलेला आहे. जांजगीर येथेंहि दोन देवालयें आहेत. पाली येथें उत्तम नकशीकाम केलेलें देवालय आहें. पेंन्ड्राहून ५मैलांवर धानपूर येथेंहि कांहीं अवशेष आहेत. शिवाय अगदीं मोडकळीस आलेले असे कोसगेन, कोटगढ, लाफागड,व मल्हार हे किल्ले आहेत. पेन्ड्राहून बारा मैलांवर असलेल्या अमरकंटक पर्वतांतून नर्मदा, शोण व जोहला या नद्यांचा उगम होतो. अमरकंटक हें हिंदूचें पवित्र स्थान आहे. पहाडावर काममंदिर नांवाचें सुंदर देवालय आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१)१२३१७६५.यांत बिलासपूर,मुंगेरी व रत्नपूर हीं तीन गांवें असून खेडीं ३२५८ आहेत. शेंकडा ९३ लोक पूर्व हिंदी भाषेची एक 'छत्तिसगडी' नांवाची पोटभाषा बोलतात. शेंकडा ९० लोक हिंदु आहेत. भाटगांवचा जमीनदार बिन्झिया असून पन्डरिया, कन्टेली व बिलैघर कटगी येथील लोक राजगोन्ड आहेत. गोन्ड लोक खेरीजकरून जंगली भागांत भैना, धनवर, व खैरवार लोक राहतात. शेंकडा ८४ लोक आपला उदरनिर्वाह शेतकीवर करतात.
कोर्बा व छुरी येथील जमींदारीत कोळसा आहे असें म्हणतात. लाफा व कोर्बा येथें लोखंडहि सांपडतें. लोर्मीच्या उत्तर भागांत व रत्नपूर येथें पितळ सांपडण्याचा बराच संभव आहे. पेन्ड्रा येथें अभ्रक सांपडतें. शिवरीनारायण येथें स्लेट-पाटयांचा दगड सांपडतो. मध्यप्रदेशांत सर्वांत उत्तम तसर रेशीम बिलासपूर जिल्ह्यांत तयार होतें गंड व केवत लोक रेशमाचे किडे पोसतात व कोष्टी लोक त्याचें रेशीम तयार करतात. बम्निदीही व कमोद येथें उत्तमपैकी सुती कापड तयार हातें. त्याचप्रमाणें तसर रेशमाची किनार असलेलें कापडहि तयार करतात. रत्नपूर व चम्पा येथें काश्यांची भांडी तयार करतात. १९०२ साली कोटाह येथें एक काडयाच्या पेटयांचा कारखाना काढण्यांत आला होता.
येथून मुंबई, व-हाड व उत्तर हिंदुस्थानांत तांदूळ, पाठविला जातो. तसेंच निर्गत मालामध्यें गहूं, तीळ, मोह-या व अळशी, चामडें, लाख, इमारती लांकूड इ. असून आयात मालांत मीठ, चणे, तूप, तंबाखू आहे. बंगाल-नागपूर रेल्वचा फांटा ह्या जिल्ह्यांतून जातो. शिवाय बिलासपुराहून कटनीला एक छोटी लाईन आहे. शिक्षणांत हा जिल्हा मागासलेला आहे.
त ह शी ल. - खालसा तहशिलीचें क्षेत्रफळ ११३५ चौ. मैल असून तींत एक गांव व ५९६ खेडी आहेत. लोकसंख्या (१९११) २५२०४३ आहे. जमीनदारी तहशिलीचें क्षेत्रफळ १९७६ चौरस मैल आहे. खेडीं ४९३ व लोकसंख्या १२७७५५ आहे. यांतील जमीनदा-या पेंडरा, केंदा, लाफा आणि मातीन ह्या आहेत.
गांव - जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. हें बंगाल-नागपूर रेल्वेवरील स्टेशन आहे. विलास नांवाच्या एका कोळिणीच्या नांवावरून या गांवाला हें नांव पडलें असें म्हणतात. येथून कटनीला एक फांटा जातो. हें गांव अर्पा नदीतीरावर वसलें आहे. लोकसंख्या सुमारें २० हजार आहे. या शहराचा मुंबईशीं मोठा व्यापार चालतो. तसर रेशमाचें व सुती कापड विणणें हा येथील मुख्य धंदा आहे येथें आसामला पाठविण्यांत येणारे मजूर गोळा करतात. येथें एक हायस्कूल व इतर प्राथमिक शाळा आहेत.