विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिलिन किंवा बलक - अल्ब्युमिना. हें एक रासायनिक द्रव्य असून ह्याची रचना बरीच गुंतागुंतीची आहे. ह्याचा प्राण्यांच्या इंद्रियरचनेशीं बराच संबंध येत असल्यानें ह्यास शरीरघटक धातु-द्रव्यें (प्रोटीन) असेंहि म्हणतात. बिलिनाच्या बाबतींतील मुख्य शोध म्हणजे एमिला फिशर व त्याचे विद्यार्थी यांनी लावलेले आहेत. बिलिनाचें विघटित पदार्थांचें शोधन अगदी बिनचुक झाल्यास ती ताबडतोब संयोगीकरणाच्या योगानें तयार करतां येतील व ज्या कांही थोडया बाबतींत यश आलें आहे ती बिलिनें संयोगीकरणाच्या योगानें तयार केलीं गेली आहेत.
ह्यामध्यें मुख्यतः कर्ब, उज्ज, नत्र, गंधक व प्राण हीं द्रव्यें असतात. ह्यांचे परमाणुभारांक बरेच भारी असून ते कोणत्याच ठराविक पध्दतीनें बिनचुक शोधले जात नाहींत. सर्व बिलिनें प्रकाश ध्रुवीभूत करतात व ती बहुतेक वामावर्ती आहेत. हीं जाळलीं असतां ह्यांच्यापासून थोडीशी निरिंद्रिय रक्षा मिळते. त्यांचा द्रव अल्कोहलमध्यें, ईथरमध्यें किंवा पाण्यामध्येंहि होत नाहीं. पण वनस्पतींमध्यें बिलिनें द्रवीभूत स्थितींत सांपडतात. हे वनस्पतीमध्येंच द्रवीभूत स्थितींत कां असतात याचा अद्याप बिनचुक शोध लागला नाहीं. कदाचित ते तेथें असणा-या क्षारांच्या किंवा इतर पदार्थाच्या सानिध्यानें विद्रुत होत असावे. हीं बिलिनें पाण्यासह तापविलीं असतां त्याचें गुणधर्म बदलतात, व ती घट्ट होतात. ती कांही ठराविक रासायनिक द्रव्यांबरोबर रंग-क्रिया देत असल्याकारणानें ओळखण्यास सुलभ जातात नत्राम्लाच्या योगानें पिंवळा रंग मिळून त्यांतच थोडें अम्न टाकलें असतां तोच रंग सुवर्णसारखा होतो. गंधकाम्लाच्या योगानें निळसर रंग मिळतो. दाहकपालाश किंवा ताम्रगंधकित यांच्यासह हीं तापविली असतां तांबडयापासून निळसर छटा मिळते. व नत्रसाम्लयुक्त पारदनत्रिताच्या क्रियेनें निळसर रंग मिळतो.
हीं बिलिनें खनिज अम्लासह उकळली असतां अम्नकर्ब-द्वि-प्राणिद व इतर अम्नयुक्त अम्लें बरींच मिळतात. ह्यांच्या विलक्षण संयुक्तिकणामुळें ह्यांचें वर्गीकरण चांगल्या रीतीनें करतां येत नाहीं. तथापि यांचें कोसल वगैरे लोकांनीं रासायनिक रीत्या चार भाग कल्पून वर्गीकरण केलेलें आहे. ते चार भाग खालीलप्रमाणें - (१)खुद्द बिलिनें, (२) बदललेल्या स्थितींत त्यांच्यापासून मिळणारे पदार्थ, (३) शरीरघटक बिलिनें अथवा औजतद्रव्यें, व (४) बिलिनिदे. पहिल्या वर्गात येणारी बिलिनें हीं पाण्यामध्यें, क्षीण अम्लामध्यें, अनाम्लामध्यें आणि निर्गुणीकृत संपृक्त द्रावणामध्यें द्रवीभूत होतात. उष्ण्तेच्या योगानें ती घट्ट होतात. ह्याच वर्गातील बिलिनें कांही वनस्पतीमध्यें किंवा कदाचित तेथें असणा-या क्षारयुक्त प्राण्यांमध्यें सांपडतात. पण ती अद्राव्य असलीं तरी त्या ठिकाणीं द्रवीभूत स्थितींत असतात. ती क्षारयुक्त द्रावणामध्यें विद्रुत होत असावीत. दुस-या वर्गात येणारे पदार्थ बिलिनांच्या बदललेल्या स्थितींत मिळतात. बिलिनें विघटित केलीं असतां त्यांपासून बिलिनसें मिळतात. ही उष्णता लावून उकळलीं असतां घट्ट होत नाहींत. ही खारवितां येतात. ह्यांच्या एका न खारवितां येणा-या जातीस पेप्टोन म्हणतात. पेप्टोन अधिक विघटित केली असतां मिळणा-या पदार्थास पेप्टाइड म्हणतात. पेप्टोन बिलिनासारखेच रंगक्रिया देतात. तिस-या भागांतील पदार्थ, दोन किंवा अधिक बिलिनें तिस-याच एका पदार्थाशीं संयुक्त होऊन संघटित झालेलीं असतात. ह्या तिस-या पदावरूनच त्यांचें वर्गीकरण करतात. चवथ्या वर्गातील पदार्थ बिलिनयुक्त असून ती विघटित केलीं असतां बिलिनस, पेप्टोन, अम्नीक-अम्लें वगैरे पदार्थ मिळतात.