विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिश्नोई - हा पंथ पूर्वी पंजाबांत सुरू झाला. राजपुतान्यांत या लोकांची वस्ती सर्वात जास्त (पांच हजार) आहे. एकंदर लोकसंख्या (१९११) ७३३९३. यांचा संस्थापक जंभाजी नांवाचा परमार रजपूत १४५१ सालीं बिकानेर येथें होऊन गेला.
यांचे धर्मपुस्तक म्हणजे एक पोथी आहे. ती हिंदी भाषेंत लिहिली आहे. तींत खालीलप्रमाणें कांही आज्ञा आहेत - स्त्रियांनी बाळांत झाल्यावर ३० दिवस व विटाळशी झाल्यापासून ५ दिवस स्वयंपाक करूं नये, सकाळी स्नान करावें, पाणी गाळून प्यावें, प्राण्यावर दया करावी, अफू वगैरे मादक पदार्थाचें सेवन करूं नये. अग्नीत आहुती द्यावी, व मुलें झाल्यावर जातकर्म करून त्यांस बिश्नोई पंथांत घ्यावें. आग्रा व आयोध्या प्रांतांत यांची कांही वस्ती आहे.