विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिष्णुपूर पोटविभाग - बंगाल, बांकुरा जिल्हा. क्षेत्रफळ ७०० चौरस मैल. लोकसंख्या सुमारें ४ लाख. या पोटविभागांतील जमीन सपाट व नदीच्या गाळाची झालेली आहे.
गांव - ढालकिशोर नदीच्या दक्षिणेस हें एक गांव आहे. हें या जिल्ह्याची प्राचीन राजधानी होय. लोकसंख्या सुमारें २० हजार आहे. ८ व्या शतकांत विष्णुपूरचें राजघराणें अस्तित्वांत आलें. व एकेकाळी बंगालच्या इतिहासांत हें फार महत्त्वाचें होतें. तें मुसुलमान नबाबाचें मांडलिक होतें. पण तें आपला राज्यकारभार स्वतंत्र राजाप्रमाणें चालवीत. १८ व्या शतकांत यांनां उतरती कळा लागली व १७७० सालच्या दुष्काळामुळें यांच्या राज्यांतील लोकसंख्या फार कमी झाली. या इस्टेटीचा सारा थकल्यामुळें हिचा लिलांव करण्यांत आला. प्राचीन काऴी या शहराचें किती मोठें वैभव होतें याची साक्ष येथील किल्ल्याचे व इमारतीचें अवशेष आज देत आहेत.
सध्यां हें तांदूळ, गळिताचीं धान्यें, लाख, कापूस, रेशीम या जिनसांच्या व्यापाराचें मुख्य ठिकाण आहे. येथें रेशमी कापड व त्यावरील नक्षीकाम हीं फार चांगली होतात.