विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बीकन्स फील्ड उर्फ बेंजामिन डिझरायली, अर्ल (१८०८-१८८१) - एक ब्रिटिश मुत्सद्दी. याचें घराणें मूळ ज्यू असून पुढें ख्रिस्ती बनलें. पूर्ववयांत त्याचें शाळेंतील शिक्षण चांगलेसें झालें नव्हतें. पण त्यानें बापाच्या मोठया लायब्ररीचा व ग्रंथकर्तृत्त्वाचा फायदा घेऊन घरच्या घरीं आपलें ज्ञान वाढविलें. सतराव्या वर्षीच एका सालिटराच्या ऑफिसांत भागीदार होऊन शिरला व त्या धंद्यांत चांगलें कौशल्य मिळविलें. लवकरच त्यानें कायद्याचा अभ्यास सुरू केला व कांदबरीलेखनहि हातीं घेतलें. त्याची 'व्हिव्हियन ग्रे' नांवाची कादंबरी बरीच लोकप्रिय झाली.
मध्यंतरी त्याचा मेंदू बिघडला. त्यांतून बरा झाल्यावर त्यानें वकिलीचा नाद सोडून कादंब-या, कविता व राजकीय लेख लिहिण्यास आरंभ केला आणि काँटेरिनी फ्लेमिंग, राज्यक्रांतिपर काव्य, ऑलरॉय, हेनरीएटा टॅपल, हा इसम कोण?, रनमीडचीं पत्रें व ब्रिटिश राज्यपध्दतीचें समर्थन हीं पुस्तकें पुढील पांच वर्षात लिहिलीं. त्यांपैकी कादंब-या लोकांनां ब-याच आवडल्या. त्यानें पार्लमेंटचा सभासद निवडून येण्याची खटपट केली, पण ती दोन वेळां फसली; अखेर तो उघड टोरी पक्षांत शिरला. इ. स. १८३७ मध्यें मेडस्टोनतर्फे कॉमन्ससभेचा सभासद झाला.
डिझरायलीनें राजकारणांतील विषयांचा मनःपूर्वक अभ्यास केला व पार्लमेंटमधील कामाच्या प्रत्यक्ष अनुभवामुळें तो लवकरच व्यवहारचतुर मुत्सद्दी बनला. तो भाषणांतून तात्त्विक निबंधद्वारा व कादंब-यांमधून आपली मतें प्रतिपादन करीत असे. १८४४ मध्यें कोनिंग्जबी नांवाच्या कादंबरीत रिफार्म बिलापूर्वीच्या राजांचे अधिकार व जनतेचे हक्क यांच्या स्थितीचें चित्र त्यानें रेखाटलें असून १८४५ मधील सीबिल नामक कादंबरीत गिरणी कामकरी व शेतकरीवर्गाच्या तत्कालीन स्थितीचें वर्णन केलें आहे.
स. १८४१ मध्यें पीलचें प्रधानमंडळ अधिकारावर आले; पण त्यांत डिझरायलीला प्रवेश मिळाला नाही. तरीहि डिझारायली पीलच्याविरूध्द जपून व केवळ स्वतःच्या तत्त्वांखातर बोलत असे. डिझारयलीची खुल्या व्यापारापासून होणा-या तोटयासंबंधी मतें पुष्कळांनां पटली व कांझरव्हेटिव्ह पक्षाचा पार्लमेंटमधील पुढारी तोच बनला. १८४७ सालपासून अखेरपर्यंत तो बकिंगहॅमशायरतर्फे पार्लमेंटचा सभासद होत गेला. स. १८५२ त डर्बी प्रधानमंडळांत त्याला चॅन्सलर ऑफ एक्स्चेकरची जागा मिळाली. पण त्यानें तयार करून पुढें मांडलेलें पहिलेंच बजेट नामंजूर होऊन तो आठच महिन्यांनीं अधिकारच्युत झाला, व पुढें सरकारविरोधी पक्षाचा पुढारी होऊन राहिला.
१८५८ मध्यें हें प्रधानमंडळहि मोडलें व डर्बीमंडळ अधिकारारूढ होऊन डिझरायली चॅन्सलर झाला; पण १८ महिन्यांतच पुन्हां पदभ्रष्ट होऊन तो पुढें सात वर्षे विरोधी पक्षनायक बनला. डिझरायली १८६८ साली मुख्य प्रधान झाला. पण ग्लॅडस्टननें आयरिशचर्चबिल पुढें आणलें व प्रधानमंडळाचा विरोध असतांहि तें बहुमतानें पास झालें. डिझरायलीनें नवी निवडणूक करविली पण तींत ग्लॅडस्टनपक्षच बहुमतानें अधिकारावर आला.
१८७४ च्या निवडणुकींत लिबरल पक्षाचा पूर्ण मोड झाला व डिझरायली मुख्य प्रधान झाला. याच्या कारकीर्दीत पहिल्या दोन वर्षात पब्लिक वर्शिप रेग्युलेशन ऍक्टशिवाय दुसरें महत्त्वाचें काम कांहीच झालें नाही. या बिलावरचे डिझरायलीचें भाषण जोरदार व पुष्कळांनां झोंबेल असें झालें व लोकमत बरेंच प्रक्षुब्ध झालें. त्यानंतर १८७५ मध्यें सुवेझ कॅनॉल कंपनीचे शेअर्स ईजिप्तच्या खेदिवापासून ब्रिटिश सरकारनें विकत घेतल्याची बातमी प्रधानमंडळानें जाहीर केली, तेव्हां सर्व देश अत्यंत आनंदित झाला. वरील आनंदांत व लोकप्रियतेंत आणखी भर घालण्याकरितां डिझरायलीनें व्हिक्टोरिया राणीला हिंदुस्थानचें सम्राज्ञीपद अर्पण करण्यासंबंधींचें बिल पुढें आणलें; परंतु आश्चर्य असें कीं, कित्येक इंग्लिशांनां तें पसंत न पडून पुन्हां डिझरायलीविरूध्द दुर्ग्रह उत्पन्न झाले. इतक्यांत यूरोपांतील तुर्कस्तानांत अस्वस्थता उत्पन्न झाली. तुर्कांविरूध्द कित्येकांची मनें खवळली व युध्द सुरू झाल्यावर तेंहि बरेंच लांबलें व अखेर प्रधानमंडळांतील त्याचे सहमंत्रीच घाबरटपणा करून लढाई टाळण्याचा हट्ट धरून बसले. इतक्या प्रतिकूल परिस्थितींतहि त्यानें बर्लिन येथील परिषदेंत चांगला विजय व लौकिक मिळविला. तेव्हां पुन्हां त्याची लोकप्रियता वाढली व व्हिक्टोरिया राणीनें कोणाहि प्रधानापेक्षां अधिक आदर व सौजन्य डिझरायलीबद्दल दाखविलें. याप्रमाणें लोकमान्यता व राजमान्यता या दोहोंचें त्यानें उच्च शिखर गांठलें; पण लवकरच अयशस्वी अफगाणयुध्दामुळें व दक्षिण आफ्रिकेतील बंडाळीमुळें त्याला उतरती कळा लागून १८८० मधील निवडणुकींत त्याच्या पक्षाचा पराजय झाला. बहुतेक तो घरी बसला. महत्त्वाच्या प्रसंगी तो पार्लमेंटांतील वादविवादांत भाग घेत असे; व इतर वेळांत त्यानें एंडिमियन कादंबरी लिहिली, ती त्याच्या पूर्वीच्या लोथेर कादंबरी इतकी उत्तम वठली नाही. तरीहि या नव्या कांदंबरीबद्दल दहा हजार पौंडाचा चेक त्याच्या घरीं चालून आला स. १८७६ मध्येंच अर्ल ऑफ बीकन्सफील्ड पदवी मिळून तो लॉर्डाच्या सभेचा सभासद बनला.
इंग्लंडला सोसाव्या लागलेल्या अपमानांची तीव्र जाणीव उत्पन्न करून उज्वल साम्राज्याभिमान जागृत करण्याचें काम त्यानें केलें यांत शंका नाहीं. साम्राज्यसंरक्षणसमर्थ असें आरमार त्याच्या धोरणामुळेंच निर्माण झालें. शिवाय लोकप्रियता किंवा राजमान्यता यांबद्दल तो नेहमी बेफिकीर असे. स्वतःचें मत व धोरण सर्व राष्ट्राची गैरमर्जी व उपहास पत्करूनहि तो पुढें मांडीत असे. त्याच्या मित्रांनां व नातेवाईकांनां कोणालाच त्याच्या स्वभावाची खरी पारख झाली नाही.
'कोनिग्जबी' नांवाच्या कादंबरीतील सिडोनिया या पात्राच्या वर्णनांत डिझरायलीच्या स्वभावाचें बरेंच स्पष्ट प्रतिबिंब पहावयास सांपडतें. जरी तो सुस्वभावी व उदार होता, तरी त्याचें अंतरंग जाणणें अशक्य होतें. जरी त्याचें वागणें संकोचवृत्तीचें नसे तरी हा उघडेपणा वरवरचा होता. तो प्रत्येक गोष्ट बारकाईनें पहात असे व नेहमी विचार करीत असे; पण मनःपूर्वक तो वादविवादांत कधींच पडत नसे. त्याचें खरें मत जाणण्याविषयीं कोणी फार आग्रह केल्यास तो संतापून कांही उलटीसुलटी विरोधात्मक विधानें करून त्यांनां गप्प बसवीत असे. लोकांच्या व्यवहारांतील गुप्त हेतु व बाह्य सबबी यांमधील विरोध उघड करून दाखविण्यांत त्याला मोठा आनंद होई. फ्रूडच्या पढील वर्णनानेंहि त्याच्या स्वभावाचें कोडें बरेंच उकलण्यासारखें आहे. ''डिझरायली हा पूर्णपणें अखेरपर्यंत ज्यू तो ज्यूच. तो ख्रिस्ती झाला व इंग्लडचा लौकिक व भरभराट यांबद्दल जरी त्याला अत्यंत कळकळ वाटत असली तरी 'इंग्रज' ह्या नांवास तो रेसभरहि पात्र नव्हता. कारण इंग्रजाचे आनुवंशिक गुणधर्म त्याच्यांत तिळमात्र नव्हते. '' नटाप्रमाणें कृत्रिम वागणूक आजन्म ठेवण्यांत त्यानें मोठी चूक केली. त्याचे परदेशी हावभाव व वेष कामन्ससभेंतील कोणासहि आवडत नसत. प्रत्येक इंग्रजास तो परक्याप्रमाणें वाटे. त्याची शांतवृत्ति व मनःसंयमनहि विलक्षण असे. प्रत्येक बाबतींत त्याची 'अति येथें माती' अशी स्थिति होत असे. तथापि ह्या सर्व गोष्टींचा त्याच्या मरणोत्तर सर्वांनां विसर पडून 'साम्राज्याभिमानी' या एकाच गुणावर तो सर्वांनां प्रिय होऊन राहिला आहे.