विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाळाजी विश्वनाथ पेशवे- मराठेशाहीच्या पूर्वरंगांत जसें भोंसलेकुलास महत्त्व, तसें उत्तररंगांत श्रीवर्धन कर भटघराण्यास महत्त्व आहे. राजारामाच्या वेळेपासून आंग्रे-सिद्दी यांच्या चुरशीनें पुष्कळ कोंकणस्थ ब्राह्मण घराण्यांस राजकारणांत पडावें लागलें, त्यापैकींच हें भटघराणें एक होय. या घराण्याकडे कित्येक शतकांपासून (१४७८ पासून) श्रीवर्धन परगण्याची देशमुखी होती व त्यामुळेंच पुढें सर्व पेशवे आपल्यास देशमुख म्हणवीत व तो कारभार चालविण्यास एक प्रतिनिधि नेमीत. श्रीवर्धनवर हबशाचा अंमल होता. भटांवर हबशाचा कांहीं कारणानें क्रोध होऊन त्यानें १६७० च्या सुमारास भटांची देशमुखी जप्त केली. तेव्हां बाळाजी विश्वनाथ तेथून निघून दाभोळ, चिपळूणकडे गेला. तिकडे बाळाजीपंतनानांचें पहिलें लग्न झालें. बाळाजीपंताचा आजा अंताजी उर्फ शिवाजी महादेव हा आणि बाप विश्वनाथ उर्फ विसाजी हा, असे दोघेहि थोरल्या शिवाजीच्या वेळीं स्वराज्यांत नोकर होते असें समजतें. पंतांचा जन्म अजमासें स. १६६० तील धरतात. त्यांचा भाऊ जानोजी हा श्रीवर्धनच्या देशमुखीचा कारभार पाही, तर हे स्वतः चिपळुणकरास जकातकामगार होते. पंत वरघाटी आल्यावर (१६७८ च्या) जानोजीस हबशानें समुद्रांत बुडविलें, कारण त्याची व आंग्-यांची हबशाविरूध्द कारस्थानें चाललीं होती असें म्हणतात. वरघाटी येत असतां पंतानीं वेळासच्या भानुबंधूस बरोबर घेतलें व त्यानां चतकोर भाकर देण्याचा ठराव केला आणि त्याप्रमाणें पेशवाई मिळाल्यावर त्यानीं भानूस सा-या मराठी राज्याची फडणविशी देवविली. वरघाटीं प्रथम सासवडास अंबाजी पुरंद-याकडे भट-भानू आले, तेथून सर्व साता-यास आले. तेथें महादजी कृष्ण जोशाच्या मार्फत शंकराजीपंत सचिवाकडे पंतास (मुतालिकीची) व अंबाजीस नोकरी मिळाली. पुढें पंतांची हुशारी पाहून सेनापति धनाजीनें त्यांस आपल्याकडे घेतलें; पंत वाढत वाढत प्रथम पुणेंप्रांताचे सरसुभेदार (कमिशनर) झाले (१६९९-१७०२) व त्यानंतर दौलताबादप्रांताचे झाले (१७०७ पर्यंत). भीमाकांठी औरंगझेबाची छावणी असतां पंतानीं औरंगझेबाच्या कैदेंत असलेल्या शाहूची व्यवस्था बादशहाच्या मुलीकडून उत्तम ठेवविली (१६९५-९९) यावरून शाहु व पंत यांचा संबंध बराच जुना होता. पंत हे एकदम कारकुनाचे पेशवे झाले, ही डफची हकीकत साफ चुकीची आहे. ते हळू हळू अधिकारसंपन्न होत होते. पंतानीं यावेळीं एकंदर मराठी दरबारची परिस्थिति सूक्ष्मपणें हेरून घेऊन शाहूस मदत करण्याचें ठरविलें. देशावर आल्यावर त्यानीं डुबेरकर बर्वे घराण्यांतील मुलीशीं दुसरें लग्न केलें होतें. तिचें नांव राधाबाईः हिला बाजीराव, चिमाजी व अनुबाई अशीं तीन मुलें झाली.
शाहु सुटून आल्यावर ताराबाईच्या पक्षांत जी मंडळी होती, त्यांत विशेष कर्तृत्ववान व तरूण आणि धाडशी असे पंतच होते. परशुरामपंत प्रतिनिधींत तडफ व निश्चय नव्हता, रामचंद्रपंत अमात्य वृध्द व थकला होता. धनाजी केवळ शिपाईगडी होता. ब्रह्मेंद्रस्वामीनें पंतानां शाहूकडे मिळण्याचा सल्ला दिला असावा व मग पंतानीं धनाजीस शाहूकडे ओढलें. खेडच्या लढाईत धनाजी जर नसता तर शाहूचें राजकारण टिकलें नसतें; त्यामुळें शाहूची मर्जी पंतांवर बसली, ती शेवटपर्यंत राहिली. शाहूच्या राज्याभिषेकापासून धनाजीच्या मृत्यूपर्यंत (१७१०) पंतानीं फारशा उलाढाली केल्या नाहींत; या काळांत ते वसुलीकाम पहात असावेत. धनाजीनंतर शाहूचा पक्ष फार दुर्बळ झाला; त्याच्याकडील मंडळी ताराबाईकडे फुटून जाऊं लागली. इतक्यांत धनाजीचा मुलगा चंद्रसेन व पंत यांचें वितुष्ट येऊन व हरणाचा तंटा होऊन, चंद्रसेन शाहूस सोडून ताराबाईकडे निघून गेला (आगस्ट १७११). यावेळी शाहूनें चंद्रसेनाच्या विरूध्द पंतांचा पक्ष घेतला; त्यावरूनच त्यांचा शाहूस किती उपयोग झाला होता हें दिसतें. या सुमारास पंतांजवळ सारी दोन हजार फौज होती; ती अपुरी जाणून त्यानीं जास्त फौज वाढवून राज्याचा बंदोबस्त चालविला; त्याबद्दल शाहूनें त्यानां सेनाकर्ते ही पदवी दिली (आगस्ट १७११) व २५ लक्षांचा सरंजाम दिला. डफहि म्हणतो ही वेळ शाहूच्या हातचें राज्य जाण्याची होती, परंतु ती एकटया बाळाजीपंतांनींच सांवरली. पुढे पंतानीं व शाहूनें ताराबाईला हतप्रभ करण्यासाठीं धाकटया शिवाजीस वेडा ठरवून, धाकटया संभाजीकडून ताराबाई व शिवाजीस कैदेंत टाकविलें. यामुळें ताराबाईचें महत्त्व व कारस्थानें लटकीं पडलीं व शाहूस निर्वेध स्थिति प्राप्त झाली (१७१२). पुढें कृष्णराव खटावकरानें ताराबाईच्या बाजूनें बंडाळी चालविली होती ती पंतानी मोडली (१७१३) व शाहूजवळ रदबदली करून परशुरामपंतांस कैदेंतून काढून पुन्हां प्रतिनिधिपद देवविलें. यानंतर हिंगणगांवच्या दमाजी थेरातानें धामधूम चालविल्यामुळें त्यावर पंत चालून गेले, परंतु दमाजीनें विश्वासघातानें त्यानां बायकामुलांसह पकडून कैदेंत ठेवून फार छळलें; अखेर दंड भरून त्यांची सुटका झाली (१७१३). त्यावर पंतानीं सय्यदांची मदत घेऊन पुढें ४ वर्षानीं दमाजीचा सपशेल पराभव केला (१७१८) आणि सचिवाला थोराताच्या कैदेंतून सोडविल्यामुळें त्याच्याकडून स्वतःसाठीं पुरंदर किल्ला मागून घेतला. कान्होजी आंग्रे ताराबाईचा पक्ष घेऊन कोंकणांत धुमाकूळ घालीत होता, त्यावर बहिरोपंत पिंगळे या पेशव्यांस शाहूनें धाडलें, परंतु कान्होजीनें त्यांचा पराभव करून त्यास कैदेंत ठेविलें, तेव्हां पंतांस आंग्रयावर धाडण्यांत आलें. सामोपचारानें आंग्र्यांची समजूत घालून त्यास शाहूकडे वळविलें. पेशव्यांची सुटका केली आणि लोहोगड आपल्यास मागून घेतला (१७१३ आक्टोबर). सारांश, पंतानीं शाहूची सर्व पंकारें बाजू वर उचलून त्यास गादीवर कायमचें टिकविलें त्यामुळें व बहिरोपंत नाकर्ता, म्हणून, शाहूनें अखेरीस मांजरीगांवी बाळाजीपंतांना यांस पेशवाईचीं वस्त्रें दिलीं (१६ नोव्हेंबर १७१३) आणि राज्यांतील दुही मोडून स्वराज्य वाढविण्यास आज्ञा केली; याच वेळीं राज्यांतील इतर सर्व नेमणुका नवीन करण्यांत आल्या.
यावेळीं शाहूची सत्ता साता-याच्या आसपास शेंपन्नास कोसांच्या आंत होती; ती आतां वाढविण्यास व शिवाजीप्रमाणें स्वराज्याचा विस्तार करण्यास बाळाजीपंतानीं सुरवात केली. शाहूची सुटका झाली, तेव्हां शिवाजीच्या वेळचें सर्व स्वराज्य व मोंगलांच्या सहा सुभ्यांवर सरदेशमुखी व चौथाई घेण्याचा हक्क त्यास दिल्लीवाल्या पातशहानें दिला. परंतु ताराबाईच्या खटपटीनें याबद्दलच्या सनदा मात्र मिळाल्या नाहींत. तुम्ही ताराबाईविरुध्द हक्क स्थापन करा मग सनद देऊं असें शहानें कळविलें. यानंतर थोडयाच वर्षांत निजामुल्मुल्क हा दक्षिणचा सुभेदार झाला, तेव्हां त्यानें मराठयांशी नेहमी विरोधाचें धोरण ठेविलें. चंद्रसेन जाधव, घाटगे, निंबाळकर, यांनां फितवून आसरा देऊन त्यानें पुण्यास आपला अंमल बसविला (१७१३). इतक्यांत बाळाजीपंतांनीं थोरात, खटावकर वगैरे बंडें मोडून पुण्यासहि आपला अधिकार बसविला. या सुमारास दिल्लीस सय्यदबंधूंचें महत्व वाढल्यानें निजामाला परत बोलावून बादशहानें हुसेनअल्ली सय्यदास दक्षिणचा सुभेदार नेमलें (१७१५); परंतु शहानें दाऊदखानास आंतून हुकूम पाठविला कीं, हुसेनास ठार मारवें. तेव्हां दाऊदनें हुसेनवर स्वारी केली, परंतु तींत तोच ठार झाला (१७१५), परंतु शहाने दाऊदखानास आतून हुकूम पाठविला की, हुसेनास ठार मारावे. तेव्हा दाऊदने हुसेनवर स्वारी केली, परंतु तींत तो ठार झाला (१७१५). मराठयांसहि बादशहानें हुसेनविरुध्द बोलाविल्यानें दाभाडे, सोमवंशी, निंबाळकर यांनीं खानदेश गुजराथेंत धुमाकूळ माजविला, बाळाजीपंतांच्या सल्ल्यानेंच ही चढाई चालू होती. तेव्हां नाइलाजानें हुसेन अल्लीनें मराठयांशी साता-यास तह करून बादशहाविरूध्द कारस्थानें चालविली (१७१८). हा तह शंकराजी मल्हारामार्फत ठरला. या तहानें शिवाजीच्या स्वराज्याखेरीज आतांपर्यंत जिंकलेला सर्व मुलूख मराठयांनां मिळाला आणि चौथाईसरदेशमुखी सर्व दक्षिणेंत वसूल करण्यांस सांपडली. त्यामुळें शाहूचा जम चांगला बसला. पेशव्यांनींहि लगेच राज्यव्यवस्था सुरळीत लाविली; तसेंच मराठयांचें लक्ष गृहकलहांतून काढून बाहेरच्या उद्योगांत लाविलें व बादशहाचें १५ हजार फौजेनिशीं रक्षण करण्याचें काम पेशव्यानीं आपल्या (शाहू) कडे घेऊन त्याला आपल्या हातीं आणलें. इंग्रजांची तैनाती फौज व ही योजना एकच होत. एकंदरीत या तहानें मराठी राज्यास नवें क्षेत्र व कामगिरी मिळाली, ह्याचें श्रेय पेशव्यांसच आहे. पुढें सय्यदांचा व बादशहांचा तंटा विकोपास जाऊन सय्यदांनी मराठयांची मदत मागितली व पेशव्यानीं सातारचा तह पुरा करून घेण्याच्या करारावर दिल्लीस प्रयाण केलें (१७१८ नोव्हेंबर). तेव्हां बादशहा घाबरला आणि मराठे व हुसेन माळव्यांत असतांनाच त्यानें मराठयांच्या मागण्या कबूल केल्या; परंतु तहांत ठरल्याप्रमाणें शाहूचीं बायकामाणसें परत मिळाल्याशिवाय मराठे मागें जाईनात; अखेर हुसेन व मराठे हे दिल्लीस गेले (१७१९ फेब्रुवारी). बादशहा व दिल्ली घाबरून गेली. बादशहाचा व सय्यदांचा समेट न होतां सय्यद बंधूंनीं पेशव्यांच्या साहाय्यानें बादशहा फरूखसेयरास पदच्युत करून रफिउद्दराजत याला तक्तावर बसविलें (२८ फेब्रुवारी). त्यानंतर शाहूची मातुश्री व बायकामुलें यांनां पेशव्यांच्या हवाली केलें, तसेंच ठरल्याप्रमाणें चौथाई, सरदेशमुखी व स्वराज्य यांच्या सनदाहि बादशाहि शिक्कामोर्तब करून हवालीं केल्या (मार्च). त्यानंतर पेशवे हे परत साता-यास आले (जुलै). दिल्लीच्या चकमकींत नागपूरकर संताजी भोंसले व बाळाजीपंत भानु हे दोघे ठार झाले, त्याबद्दल पेशव्यानीं नुकसानभरपाई घेतली. सय्यदांपासून रोज ५० हजार रू. खर्चास मिळत. त्यापैकीं निम्मे शिल्लक टाकून पेशव्यांनीं ती सर्व शिल्लक सरकारच्या खजिन्यांत टाकली व फौजेच्या देण्याचा बोभाटहि राहूं दिला नाहीं. याप्रमाणें या दिल्लीच्या पहिल्या स्वारीनें मराठयांस पुष्कळ फायदा झाला.
यानंतर पेशव्यानीं राज्यकारभाराची सर्व व्यवस्था उत्तम प्रकारें लावून दिली; चौथाईवसुलीच्या मुलुखगिरीसाठीं निरनिराळे प्रदेश सरदारांनां वांटून देण्यांत आले; एकानें दुस-याच्या प्रांतांत जाऊं नये असें ठरविलें. साहोत्रा, नाडगौडा वगैरे बाबी निरनिराळया म्हणजे प्रत्येक सरदाराच्या प्रांतांत येत असल्यानें एकमेकांवर एकमेकांचा दाब राही; परंतु पुढें या पध्दतीस सरंजामी व पिढीजादी स्वरूप येऊन तिचा मुख्य सत्तेवर वाईट परिणाम झाला. पेशव्यांनीं ही पध्दत कायमची केली नव्हती; तींत उत्तरोत्तर सुधारणा झाल्या असत्या तर झालेला दुष्परिणाम टळला असता; मात्र या पध्दतीमुळें मराठयांच्या राज्याचा सर्वत्र झपाटयानें प्रसार झाला. उलट पेशव्यांच्या या व्यवस्थेनें शिवाजीची अष्टप्रधानांची (अधिकारविभागणी) राज्यपध्दति नष्ट होऊन तिला एकमुखी स्वरूप आलें. ही एकमुखीपध्दति तिच्या कर्त्याच्या गुणदोषांप्रमाणें चांगलीवाईट असूं शकते. राष्ट्र वर्धिष्णु व्हावयास लागलें म्हणजे जी एक प्रकारची धडाडीची व जोराची उचल करावयाची असते, तीच बाळाजी पंतानीं व पुढील पेशव्यांनीं केली होती आणि तीस मोगलपक्षपाती लोकांचा विरोध होऊं नये म्हणून बादशाही परवानगी मिळविली होती.
बाळाजीपंतानीं राज्यकारभाराची शिस्त बसविल्यावर एकदां इस्लामपूरकडे स्वारी केली (नोव्हेंबर). पुढल्या सालीं थोरल्या बाजीरावाचे लग्न केल्यावर (मार्च, सन १७२०), एकाएकीं बाळाजीपंताचें देहावसान सासवड येथें झालें (१ एप्रिल). हल्ली तेथें त्यांचें वृदांवन आहे. त्यांची पत्नी राधाबाई कर्ती स्त्री होती. त्यांच्याबद्दल पुढील अभिप्राय योग्यपणें दर्शविला आहे. ''शाहूची सेवा निष्ठेनें करून, राज्यांतील मर्द व शहाणे ऐसा लौकिक वाढवून प्रधानपद मिळवून जीवादारभ्य श्रम करून, शत्रू पराभवातें पाठवून बाळाजीपंतानीं महाराजांच्या राज्याचा बंदोबस्त केला.'' न्यायाच्या कामी ते शाहुछत्रपतीच्या नातलगांचीहि भीड ठेवीत नसत. (पेशवेबखर; का. सं. प. यादी; धडफऴे यादी, शाहूची रोजनिशी व चरित्र, भा व प. यादी, राजवाडे. खंड. २, ३, ४; इ. सं पे. द. माहिती; डफ.)