विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बीरबल- हा अकबराच्या दरबारांतील कविराय व मंत्री होती. औदार्याबद्दल, तसेंच गानकौशल्य व काव्यनैपुण्य याबद्दल तो फार प्रसिद्ध आहे. त्याच्या छोट्या कविता आणि विनोदपर गोष्टी लोकांच्या तोंडीं आहेत. धार्मिक मुसुलमानाकडून ह्याचा द्वेष केला जात असें. याचें कारण त्यांच्या मतें इस्लामविषयीं अकबराचें मन दूषित करण्याचा त्यानें प्रयत्न केला. ह्याचा जन्म १५२८ सालीं झाला. याचें मूळचें नांव महेशदास असून हा काल्पीचा कनोजी ब्राह्मण होता. हा प्रथम अंभेरचा राजा भगवानदास याच्या पदरीं कवि म्हणून होता. पण अकबराच्या राज्यारोहणाच्या वेळीं भगवानदासानें अकबरास नजर म्हणून याला दिलें. यावेळीं तो आपल्याला ब्रह्मकवि हें नावं लावीत असें. अकबराच्या दरबारीं पथम प्रथम हा गरीबानें रहात असें पण तो चलाख व तीव्र बुद्धीचा म्हणून प्रसिद्ध होता. त्याचीं छोटीं हिंदी काव्यें फार लोकप्रिय होतीं. अकबरानें त्याला कविराय ही पदवी दिली व आपल्या खास देखरेखीखालचें काम त्याच्याकडे सोंपविलें. १५७४ सालीं त्याला नगरकोटच्या जयकंद राजाची जहागिरी व राजा हा किताब अकंबर नें दिला. सन १५८३ सालीं यूसूफजइ लोकांच्या विरूद्ध झैनखान कोका याला मदत करण्यासाठीं अकबरानें बीरबलाला पाठविले पण तो तेथें ठार मारला गेला. बदौनीनें असें लिहिलें आहे कीं 'प्राणरक्षणार्थ बीरबल हा पळून जात असंता तो मारला गेला; व नरकामध्यें कुत्र्याच्या पंक्तीला जाऊन बसला; व अशा रीतीनें इहलोकीं केलेंल्या, एनक दारूण कृत्यांबद्दल त्याला योग्य प्रायश्चित्त मिळालें. अकबराला बीरबलाच्या मृत्यूबद्दल अतोनात दुःख झालें.
बीरबलानें अकबरपूर नांवाचें एक शहर वसविलें होतें व तो तेथेंच रहात असें. या शहराच्या नारनौल भागामध्यें त्याचे वंशज अद्यापि रहातात. बीरबलाचा एकहि समग्र ग्रंथ उपलब्ध नाहीं. तरीपण त्याची छोटी कविता प्रत्येकाच्या तोंडीं आहे. बीरबलानामा नांवाचा एक ग्रंथ विकत मिळतो त्यांत अकबर व बीरबल यांच्याविषयींच्या अनेक विनोदी गोष्टी आढळून येतात.