विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुखारा- मध्यआशिया. उझबेग या सोव्हिएट सोशियालिस्ट लोकसत्ताक राज्यांतील एक संस्थान. हें मध्यऑक्सस नदीच्या दक्षिणतीरावर असून याच्या उत्तरेस, सिरदारिया आणि समरकंद, हे रशियन प्रांत आहेत. पूर्वेस फरधणा प्रांत दक्षिणेस अफगाणिस्तान व नैॠत्यैस ट्रन्सकॅस्पिपन मुलूख व खीवा आहे. क्षेत्रफळ सुमारें ७५ हजार चौरस मैल आहे. बुखारामधील मुख्य नदी ऑक्सस होय.
बुखाराची लोकसंख्या ३०००००० आहे. उझबेग ही मुख्य जात होय. त्याचप्रमाणें तुर्कोमन, सार्ट व किरगिझ हे लोकहि राहतात. शिवाय अफगाण, अरब, इराणी यहुदी हे लोक आहेतच. येथें सिंधमधील शिकापूरच्या लोकांची वस्ती सुमारें ३०० असून बराचसा व्यापार त्यांच्या हातीं आहे. कच्चा येथून कापूस, रेशीम सतरंज्या, फळें इत्यादी जिन्नस रशियाला पाठविले जातात. कापूस, चहा, नीळ व शाली ह्या वस्तू हिंदुस्थानांतून या ठिकाणीं येतात.
येथील १/४ वर लोकसंख्येस लिहितांवाचतां येतें असें सांगतात. प्राथमिक शिक्षणाच्या शाळा व उच्च शिक्षणाकरितां विद्यालयेंहि पुष्कळ आहेत. ट्रान्सकास्पियन रेल्वे बुखा-यामधून जाते. ऑक्सस नदींतून बोटी चालतात.
इ ति हा स.- पूर्वीं बुखारा हें सोगडिआना या नांवानें माहीत होतें. बुखारा राजधानी अफ्लासीआब या इराणी वीरानें बसविली असें म्हणतात. अलेक्झांडरच्या विजयानंतर सांगडिआना हें सेल्युसिद राज्यांत समाविष्ट करण्यांत आलें. पुढें युएची या रानटी जातीनें बॅक्ट्रिया व सोगडिआना हीं काबीज केलीं. इराणमधील सस्सानियन वंशानें फिरून हा मुलूख काबीज केला. ६४०-४२ सालीं अरबांनीं इराण जिंकलें तेव्हां हा मुलूख त्यांच्याकडे आला व तेथें इस्लामी धर्माचें बीजारोपण करण्यांत आलें. या वेळीं सोगडिआनाला सुघड असें म्हणत. यांत बुखारा व समरकंद अशीं दोन महत्त्वाचीं शहरें होतीं. इराणमधील सेलजुक वंशांतील तिसरा राजा मलीकशहा यानें ११ व्या शतकाच्या अखेरीस ऑक्सस ओलांडून सिरदारिया व ऑक्सस यांच्या आसपासचा मुलूख जिकिला. १२१६ सालीं महंमदशहा ख्वारिझम यानें बुखारा काबीज केलें. त्याच्यापासून १२२० सालीं तें चेंगीझखानानें घेतलें. याच्या वंशजापासून तें ३६९ सालीं तैमुरनें हिसकावून घेतलें. पुढें तें बाबराच्या ताब्यांत आलें. १५०० मध्यें उझबेग तार्तरांनीं बळकावलें या वंशांतील अबदुल्लाखान (१५५६-९८) याच्या कारकीर्दीत बुखाराची फार भरभराट झालीं. १५९८ सालीं तैमूरचा वंशज बाकी महमदखान यानें बुखाराच्या राज्यावर आरोहण करूंन आश्तरखानाईद वंशाची स्थापना केली.
१७८५ सालीं अश्तखानाईद वंशाची इतिश्री होऊन मंघित वंशानें राज्य बळकाविलें. १८६६ सालीं रशियन सैन्यानें बुखारावर स्वारी केली. व त्यानें अमीरास शरण येण्यास भाग पाडलें. या वेळेपासूनच बुखारा येथील अमीर रशियाच्या हातांतील बाहूलें होऊन राहिला.
१९१९ सालीं राज्यक्रांति होऊन अमीरास हांकलून दिलें व बुखा-यांत सोव्हिएट राज्य सुरू झालें. यानें रशियन सरकारशीं लष्करी व राजकीय तह केला. स. १९३४ च्या सप्टेंबरांत बुखारा व खीवा एकत्र जोडून उझबेगचें सोव्हिएट सोशियालिस्ट लोकसत्ताक राज्य बनविण्यांत आलें.
या संस्थानच्या राजधानीचें नांवेहि बुखाराव आहे. २८ फूट उंच व ८ मैल लांबीच्या भिंतीचा या शहराला कोट आहे. शहरांत ३६० मशिदी, १४० मद्रसा व ब-याच प्राथमिक शिक्षणाच्या शाळा आहेत. या शहरांत उत्तमोत्तम व मौल्यवान गंथांचे संग्रह अजूनहि आहेत. लोकसंख्या सुमारें ७५००० ते १००००० आहे.