विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुखारेस्ट- रूमानियाची राजधानी. सन १९१७ मध्यें लोकसंख्या ३०८९८७ होती; येथें ४०००० वर ज्यू लोक व ५०००० वर परदेशचे लोक आहेत. व हे बहुतेक ऑस्ट्रोहंगेरियन आहेत. बुखारेस्टचें क्षेत्रफळ २० मैलांपेक्षां जास्त आहे. या शहरांतून डिमबोव्हिटझा नदी वहाते. येथील बगींच्यामुळें, धर्ममंदीराच्या मनो-यामुळें व घुमटामुळें हें शहर दुरून पाहाणारास अतिशय सुंदर आणि रमणीय दिसतें. वारंवार होणा-या भूंकपामुळें पुष्कळ घरें पूर्वीं लांकडाचीं बांधलेलीं होती; प्रिन्स चार्लसच्या राज्यारोहणानंतर (१८६६) ब-याच सुधारणा झाल्या. स्वच्छ पाण्याची, ग्यासच्या व विजेच्या दिव्यांची व घोड्यांच्या व विजेच्या ट्राम्बेची सोय येथें झालीं आहे.
बुखारेस्टच्या पूर्वेकडील पॅरिस म्हणतात. हें शहर विद्येचें मोठें केंद्र आहे. येथें व्यापार, कला व शास्त्र शाळा आहेत. येथें १८६४ सालीं एका विश्वविद्यालयाची स्थापना करण्यांत आली. येथें पुष्कळ वाचनालयें असून राष्ट्रीय वाचनालयांत पुष्कळ पौरस्त्य मौल्यवान ग्रंथ आहेत.
१५९५ सालीं हें शहर तुर्कांनीं जाळलें. त्याच्या पुनर्रचेनंनंतर प्रिन्स कान्स्टंटाइन ब्रान्कोव्हान यानें आपली राजधानी केली. १८ व्या व १९ व्या शतकांत बुखारेस्टच्या मालकीबद्दल तुर्कलोक आस्ट्रियन लोक व रशियन लोक यांच्यांत बरेच तंटे झालें. १८६१ सालीं बालिचिया व मोलडेव्हिया हे जोडण्यांत आले. येथील तट व किल्ला अतिशय मजबूत असूनहि गेल्या महायुद्धांत हें जर्मनांनीं काबीज केलें होतें.