विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुद्धि (रीझन)– तत्त्वज्ञानांत तार्किक अनुमानें काढण्याच्या शक्तीस अथवा क्रियेस बुद्धि म्हणतात. मनुष्य बुद्धिवान आहे असें म्हणण्यांत मुख्य भेद हा दर्शविला जातो कीं, मनुष्य गृहीत गोष्टींपासून अनुमान काढूं शकतो, पण इतर प्राणी तसें करूं शकत नाहींत. तथापी सूक्ष्म निरीक्षणावरून, इतर प्राण्यांसहि अनुमानें काढतां येतात असें दिसतें. उच्च दर्जाचे मानवोत्तर प्राणी व अगदीं खालच्या वर्गांतील मानवजाती यांमध्यें इतकें साम्य आहे कीं, कित्येक मानसशास्त्रज्ञ यांची बुद्धि एकाच प्राकरची असून प्रमाण मात्र कमजास्त असतें असें म्हणतात. परंतु मानवी अनुमान व पाशवी अनुमान यांच्यांत महत्त्वाच्या भेद आहे. मानवी अनुमानांत आत्मज्ञान असतें. पाशवी अनुमानांत तें नसतें. कांहीं पशूंस स्वप्नें पडतात हें खरें; तथापि मानवेतर प्राण्यांच्या मनांत कल्पनाचित्रें येऊं शकतात याबद्दल पुरावा उपलब्ध नाहीं.
'बुद्धि' हा शब्द संकुचित अर्थीं वापरला जातो. बुद्धि ही इंद्रियज्ञान, संवेदना, भावना, इच्छा यांच्या व्यतिरिक्त असलेली शक्ति असून तीमुळें मूलसत्यें अंतःस्फूर्तीनें समजतात. अनुभवप्रामाणवादी या शक्तीचें अस्तित्व कबूल करीत नाहींत. सर्व गोष्टींचें कारण हीं मूलसत्येंच होत. कांटच्या मतें बुद्धि ही बौद्धिक विचार सर्वव्यापी तत्त्वांच्या योगनें एक करणारी संयोगकारक शक्ति आहे. ज्या शक्तीमुळें अनूभवपूर्व तत्त्वें समजतात, तीस कांट 'शुद्ध बुद्धि' असें म्हणतो. ही शक्ति विशिष्ट गोष्टी करण्यास लागणा-या 'व्यावहारिक बुद्धी' हून भिन्न आहे.
अँरिस्टॉटलच्या वेळेपासून तर्कशास्त्रांत निगम व आगम असें बुद्धीचे दोन भेद करण्यांत आले. नियम तर्क म्हणजे सामान्य तत्त्वापासून विशिष्ट सिद्धांत व आगम म्हणजे विशिष्ट सिद्धांतापासून सर्वसामान्य तत्त्वें काढणें होय. धर्मशास्त्रांत श्रद्धा व बुद्धि यांत भेद केला जातो व बुद्धि धार्मिक सत्याचें स्पष्टीकरण देते अथवा संशोधन करते. धर्मशास्त्राचीं मूल दैवी सत्यें बुद्धिगम्य नाहींत. ती श्रद्धेचा विषय आहेत असा ख्रिस्ती लोकांचा समज आहे.