विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुन्सेन (१८११ - १८९९) एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ. कॉलेजचें शिक्षण घेऊन तो प्रथम शिक्षक व नंतर रसायन शास्त्राचा अध्यापक झाला. स. १८३४ ते त्यानें तालस विषयावर लोहउज्जप्राणिल हें औषध शोधून काढलें व पुढें ककोडिल नांवाच्या द्रव्यांचा शोध लाविला. या शोधांमुळें तो बराच प्रसिद्धीस आला. या शोधांमुळें सेंद्रिय पदार्थांचा धातुरूप पदार्थांशीं होणारा संयोग स्पष्ट होऊन रसायन शास्त्राचें एक पाऊल पुढें पडलें. याबरोबरच लोखंडच्या हवाभट्टींतून निघणा-या वायूच्या घटनेकडे त्याचें लक्ष वेधलें. जर्मनींत भट्टीला दिल्या जाणा-या उष्णतेचा अर्धा भाग व इंग्लंडांतल्या भट्ट्यांतील उष्णतेचा ४/५ भाग फुकट जातो असें त्यानें दाखविले. या शोधांमुळें लोखंडाच्या कारखान्यांत क्रांति झालीं. त्याच वेळेस वायूंचें आकारमान मोजण्याच्या पद्धती प्रचारांत आल्या या विषयावर बुन्सेन यानें एक पुस्तक लिहिलेलें आहे. १८४१ सालीं त्यानें कर्बजस्त विद्युत्पात्र शोधून काढलें. या पात्रास त्याचेंच नांव चालू आहे. या पात्राचा उपयोग त्यानें विद्युत्कमान करण्याकडे केला व एका तासांत १ पौंड जस्त खर्च होऊन ११७१.३ मेणबत्यांच्या प्रकाशाइतका प्रकाश पडूं शकतो असें दाखविलें हा प्रकाश मोजण्याकरितां त्यानें प्रकाशमापनयंत्र तयार केलें; त्यालाहि त्याचेंच नांव चालू आहे. १८५२ त त्यानें विद्युत्पृथक्करणाची युक्ति प्रथम काढिली व प्रथम मग्न धातु धातुरूपांत काढून दाखविली व ती जळतांनां पडलेल्या प्रकाशांत अत्यस्मानी किरण असतांत हें दाखविलें. १८५५ सालीं त्यानें धूर न निघतां कर्बवायु जाळण्याकरतां बुन्सेन दिव्याचा शोध लावला. त्याचे इतर शोध, बर्फाचें उष्णमानमापक यंत्र, बाष्पोष्णमापक यंत्र, व गाळण्याचा पंप हे होत रंगपृथक्करणावर यानें फार परिश्रम केलें. यानें रसायनशास्त्रज्ञ व ज्योतिषशास्त्रज्ञ यांच्या हातांत एक नवीन शास्त्र दिलें. या रंगपृथक्करणानेंच व त्यानें खट (केल्शियम ) व रूपद (रूबिडियम) या धातुद्रव्यांचा शोध लाविला.