विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुरूड- बुरूड हें वास्तविक एका विशिष्ट जातीचें नांव नसून धंद्याचें वाचक नांव आहे. हा धंदा अनेक जातींचे लोक करतात. त्यांत क्षत्रियांपासून अंत्यज वर्गाचेहि लोक मोडतात. तथापि 'बुरूड' या नांवानें एक विशिष्ट जात ओळखली जाते. त्या जातीची माहिती पुढें दिली आहे. यांची एकंदर लोकसंख्या (१९११) ४२५१४. पैकीं हैदराबाद संस्थानांत सर्वांत जास्त लोक (सु. २५ हजार) आहेत. मुंबई इलाख्यांतील लोकसंख्या ११७४५. हे दक्षिण हिंदुस्थानांत व कर्नाटकप्रांतांत आढळतात. या लोकांनां मेदार हें तेलगु नांव आहे. १२ व्या शतकांत कर्नाटकांतील बुरूड लिंगायत झालें असावेत. लिंगायत बुरूड कानडी बोलतात व महाराष्ट्रीय बुरूड मराठी भाषा बोलतात. हे बांबूच्या टोपल्या, पंखे इत्यादि वस्तू तयार करतात. कांहीं कारखानदार, मालगुजार, वैद्य, कॉन्ट्रॅक्टर, शाळामास्तर वगैरेहि धंदे अलीकडे करूं लागलें आहेत. वैष्णव, शैव व लिंगायत असें तीन पंथ यांच्यांत आहेत. कांहीं वैष्णव बुरूड जानवें घालतात. नित्यनैमित्तिक कार्यें ब्राह्मण पुरोहितांकडून करवितात. लिंगायतांचे धार्मिक विधी जंगम करतात. कांहीं लोक दोघांसहि मान देतात. बुरूड हें नांव भृगु, बृहस्पति वगैरेंवरून पडल्याचें सांगण्यांत येतें. (महाराष्ट्रीय हिंदुधर्मपरिषद-रिपोर्ट १९२० (पृ. १९ व २०) आणि रिपोर्ट १९२१ (पृ.६८).) व आपली जात क्षत्रिय असल्याबद्दल पांचालाप्रमाणें हें यज्ञकर्माचा पुरावा पुढें मांडतात. महाराष्ट्रीय बुरूडांच्या कुळी देवकांवरून पडलेल्या आहेत. उदा० मोरेकुळीचें देवक मोर, 'नागे' चें नाग, 'घोरपड,चे इत्यादि. देवक कणकेचें करतात. तेलगू व इतर बुरूडांत भृगु वगैरे १०१ गोत्रें आहेत.
नागपूर, चांदा, कामठी, निर्मळ, मुंबई, पुणें, आळंदी, जेजुरी वगैरे ठिकाणीं यांचीं देवळें असून, कांहीं ठिकाणीं धर्मशाळा आहेत. कोलनपाका, दक्षिणकाशी, माणूर या ठिकाणीं मठ आहेत. कोलनपाका येथें यांच्यासंबंधी वंशावळी वगैरे माहिती देणारे बरेच लेख आहेत.
बसोड, बंसफोड या जाती बुरूडांचा धंदा करतात. पण इतर बुरूड त्यांनां आपल्या जातींतले समजत नाहींत. या जाती आपणापेक्षां नीच आहेत असें मानतात. अंत्यज व इतर वर्गांतील जे लोक बुरूडांचा धंदा करतात त्यांचा व बुरूड जातीचा कांहीं एक संबंध नाहीं. मध्यप्रांत व पंजाब या इलाख्यांतूनहि बुरूडांची वस्ती आढळतें. (मुंबई, सेन्सस रिपोर्ट; श्री. पी. विठ्ठलराव पतकोतवार यांच्या टिपणी व श्री. लक्ष्मण विठ्ठल मेदार (नागपूर) यांनीं पाठविलेली माहिती.)