विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बृहस्पतिस्मृति- या स्मृतीचें महत्त्व इतर स्मृतींप्रमाणेंच-पण कांहीं भिन्न कारणामुळें-फार आहे. हींत हिंदु कायद्याचें विस्तृत विवरण असून मनुस्मृतीशीं तिचा फार संबंध आहे. या स्मृतीवरून पुष्कळशा प्राचीन स्मृतींचा काल ठरविण्यास फार सोपें जातें. या स्मृतींत मनुस्मृतीचा कांहीं ठिकाणीं तर कांहीं ठिकाणीं अप्रत्यक्ष उल्लेख केलेंला असून कांहीं विषयांवर अर्थबोधक टीकाहि केलेंली आढळतें. बृहस्पति असें प्रतिपादन करतो कीं, मनूविरूद्ध कोणत्याहि गोष्टी ख-या मानू नयेत. स्कंदपुराणांत अशी एक दंतकथा आहे कीं, मूळ मनुस्मृतीचे भृगु, नारदृ बृहस्पति आणि अंगिरस यांनीं चार भाग केलें. अर्थातच नारद आणि बृहस्पती यांचें आपआपसांतच मतैक्य असणें स्वाभाविक आहे. कांहीं पारिभाषिक शब्द दोहोंत एकच आहेत (उदा. दीनार १०.५) तरी पण बृहस्पति हा मनूचा पुष्कळ बाबतींत अनुयायी असल्यामुळें बृहस्पतिस्मृति ही नारदस्मृतीच्यापूर्वीं लिहिली गेली असवी, असें अनुमान काढणें भाग पडतें. कित्येक तर या स्मृतीचा काल पहिलें शक होय असें म्हणतात. अन्यपक्षीय लोकांचें असें म्हणणें पडतें कीं, ज्याअर्थीं बृहस्पतीचें कित्येक गोष्टींत-उदाहरणार्थ स्त्रियांचे हक्क-विचार प्रागल्भ्य दिसून येतें व एकंदरींत ज्या विचारसरणीचा अवलंब केला आहे, त्यावरून नारदस्मृतीनंतरच बृहस्पतिस्मृति झालीं असावी. डॉ. फॉरचॅमरच्या मतें बुद्धधर्मीय धम्मत्थत्स कायदे आणि बृहस्पतिस्मृति यांत बरेंच साम्य असल्यामुळें ही स्मृति सातव्या शतकांत लिहिली असावी. नारदस्मृतीप्रमाणें याहि स्मृतीचें मृच्छकटिक नाटकांतील न्यायपद्धतीशीं जुळते. अशा पुष्कळ कारणांवरून या स्मृतीचा काल सहाव्या शतकाच्या पुढें लोटतां येत नाहीं. दिवाणी आणि फौजदारी कायद्यांसंबंधानें हें लिहिणें झालें परंतु दान, व्रत, प्रायश्चित्त व इतर धार्मिक विधी इत्यादिंकासंबंधानें जीं वचनें या स्मृतींत आहेत त्यांचे उल्लेख हेमाद्रीच्या चतुर्वर्गाचिंतामणींत, देवभट्टाच्या स्मृतिचंद्रिकेंत आणि इतर कित्येक धर्म-निबंधांत सापडतात. परंतु हीं वचनें फार नसून त्यांतून निष्पन्न होण्याजोगेंहि कांहीं नाहीं.