विभाग आठरावा : बडोदें ते मूर  
 
बेगुन- राजपुताना, उदेपूर संस्थानांतील बेगुन इस्टेटीचें मुख्य शहर; उदेपूर शहराच्या ईशान्येस सरासरी ९० मैलांवर हें आहे. येथें एक उत्कृष्ट राजवाडा व मजबूत किल्ला आहे. हें शहर व १३० खेडीं ज्या इस्टेटीमध्यें आहेत ती मेवाडच्या एका पहिल्या प्रतीच्या सरदाराची असून, तीस रावत सवाई म्हणतात. उत्पन्न सरासरी ४८००० रू. आहे, व ५२०० रू. दरबारास खंडणी देण्यांत येते. बेगुनचे रावत सिसोदिया रजपुतांच्या चोंडावल शाखेचे होत. परंतु यांत मेनाल म्हणून एक खेडें आहे, त्याला पूर्वीं महानाल असें म्हणत; तेथे एक मठ व शिवाचें देऊळ आहे; त्यावरील खोदलेल्या लेखावरून तें ११६८ सालीं प्रसिद्ध पृथ्वीराज चव्हाणाच्या सुहावदेवी उर्फ रूचीराणीनें बांधलें असावें असें दिसतें.