विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेचुना- आफ्रिकेंतील बांटु-नीग्रो लोकांच्या एका शाखेला बेचुना असें म्हणतात. ते बेचुआनालँड, बासुटोलँड, आरेंज रिव्हर कॉलनी व ट्रान्सव्हालच्या उत्तरभागांतील व पश्चिमभागांतील जिल्हे यांतून राहतात. त्यांचे बेचुना व बासुटो असें दोन भाग आहेत. बेचुना लोकांची सरासरी उंची ५ फूट ६ इंच आहे. त्यांचा बांधा नाजुक असून रंग तांबूस पिंगट असतो. त्यांच्यातील प्रत्येक जात एका दैवक प्राण्याला पूज्य मानते. म्हातारे व रोगी मुलें यांनां ठार मारण्याची अमानुष चाल त्या लोकांत होती. पुरूष व बायका कातड्यांचीं वस्त्रें वापरतात. बायका डोक्यावरील केस काढतात; मात्र टाळूवर केंस राखून ते रूद्राक्षांनीं भूषित करतात. बेचुना लोक विशेषकरूंन कृषिकर्मी, शिल्पकर्मी आहेत. मिशनरी लोकांच्या प्रयत्नांमुळें पुष्कळ लोक ख्रिस्ती झालेंले आहेत. कोठें कोठें लोक नरमांसभक्षकहि आहेत. हे लोक बेचुना भाषा बोलतात.