विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेंटिंक, लॉर्ड विल्यम (१७७४-१८३९)- हिंदूस्थानचा एक गाव्हर्नर-जनरल. पोर्टलंडच्या तिस-या ड्यूकचा हा दुसरा मुलगा. लष्करांत प्रवेश केल्यानंतर, चढत चढत तो लेफ्टनंट कर्नलच्या हुद्यापर्यंत गेला. मॅरेनोच्या लढाईंत तो हजर होता. पुढे तो मद्रासचा गव्हर्नर म्हणून नेमला गेला. परंतु १८०७ सालीं वेलोरचें बंड झाल्यामुळें मद्रासच्या गव्हर्नरच्या जागेवरून त्यास कमी करण्यांत आलें. अम्हर्स्ट विलायतेस परत गेल्यानंतर हिंदुस्थानच्या ग. ज. च्या जागीं बेटिंकची नेमणूक करण्यांत आली. १८२७ पासून १८३५ पर्यंत तो या हुद्यावर होता.
बेंटिक हा हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल असतांना, हिंदुस्थानांत त्यानें अनेक उपयुक्त नव्या सुधारणा घडवून आणल्या. त्यांपैकीं मुख्य मुख्य अशा:–(१) सती जाण्यास त्यानें बंदी करूंन, ती चाल हळू हळू बंद पाडली. (२) ठग लोकांचा पुरा बंदोबस्त करूंन, अनेक ठग लोकांस पकडून ठार मारिलें. ज्यांनीं आपले अपराध कबूल केलें, त्यांस क्षमा करूंन शेतीमाती देऊन बेंटिंकनें उद्योगास लाविलें. (३) हिंदुस्थानांतील प्रजेस पाश्चात्य त-हेचें शिक्षण देऊन तिला विद्यासंपन्न करण्याचा बेंटिंकनें निश्चय केला. हिंदुस्थानांतील प्रजेस अज्ञानी व अडाणी ठेवून त्यांच्यावर राज्य करण्यापेक्षां प्रजेला उत्तम शिक्षण देऊन सुसंस्कृत करावें, म्हणजे त्यांच्यावर राज्य करणें सुलभ होईल असें आपलें मत दर्शविलें. याला अनुसरून, इंग्रजी शिक्षण देणा-या अनेक शाळा ठिकठिकाणीं उघडण्यांत आल्या. (४) हिंदुस्थानांतील लोकांस बेंटिकनें महत्त्वाच्या व उच्च नोक-या देण्याचा उपक्रम सुरू केला. (५) लष्करांतील नोकरांचा भत्ता कमी केला. (६) अफू विकण्याचे परवाने देण्याचा कायदा केला. (७) कलकत्त्यास स. १८३५ त वैद्यकीची एक नवीन पाठशाळा स्थापून, तींत पाश्चात्य पद्धतीवर शस्त्रक्रियेचें व वैद्यकीचें शिक्षण देण्याचा उपक्रम केला. (८) काचार व कूर्गप्रांत हीं राज्यें खालसा करूंन बेंटिंकनें तीं ब्रिटिश राज्यास जोडलीं.