विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेडन- सहाशें फूट उंचीच्या टेंकडीवर वसलेले जर्मनीचें बेडनसंस्थानांतील एक डौलदार आरोग्यकारक स्थळ. इ. स. १९१९ मध्यें येथील रहिवाशांची संख्या १५४४४ होती. परंतु दरवर्षी ७०००० पेक्षां जास्त लोक, जगाच्या सर्व भागांतून या ठिकाणी कांहीं दिवस रहावयासाठीं येतात. स १८७० च्या युद्धपावेतों येथें फ्रेंच लोकांचाच फार भरणा होता. परंतु अलीकडे येथें अमेरिकन, रशियन, व इंग्लिश लोकांची संख्या बरीच वाढली आहे. येथें ऊन पाण्याचे २९ झरे आहेत. त्यांचे उष्णमान ११५० पासून १५३० अंशापर्यंत असतें. या पाण्यानें दीर्घकाल संधिवात, वात रक्त, पक्षघात, मज्जातंतुव्यथा, मुतखडा, मूत्राम्ल, इत्यादि विकार बरे होतात.
प्राचीन काळीं रोमन लोकांस येथील झ-यांबद्दल माहिती होती असें दिसतें. येथें असलेल्या एका शिलालेखावरून असें अनुमान काढतात कीं हें शहर हॅडियन बादशहानें वसविलें असावें. १८४७ सालीं नव्या किल्ल्याखालीं रोमन लोकांच्या बाष्पनिमज्जनगृहांचें कांहीं अवशेष सांपडले. 'तीस वर्षांच्या' युद्धांत या शहराचें फार नुकसान झालें. फ्रेंच लोकांनीं प्रथम याला १६४३ सालीं लुटलें, व नंतर १८८९ सालीं जाळून टाकलें. परंतु पुढें १९ व्या शतकाच्या आरंभापासून सरकारच्या नजरेखालीं याची याची बरीच वाढ झालीं आहे.