विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेने-इस्त्रायल- हें नांव मुंबई इलाख्यांत रहाणा-या ज्यू लोकांनां आहे. यांची वस्ती सुमारें दहा हजार आहे. या समाजाजवळ स्वतःच्या ऐतिहासिक माहितीचे कागदपत्र नाहींत. त्यांच्या हिंदुस्थानांतील आगमनाची एक दंतकथा अशी आहे कीं, प्राचीन काळीं एका फुटक्या जहाजांतील सात पुरूष व सात बायका हिंदुस्थानच्या किना-यावरील मुंबई बेटाच्या दक्षिणेस सुमारें तीन मैलांवर जमिनीस लागल्या. त्यांच्याबरोबरच्या इतर मंडळींचीं प्रेतें किना-यावर लागलीं. पैकीं पुरूषांचीं प्रेतें एका ठिकाणीं व बायकांचीं दुस-या ठिकाणीं त्यांच्या ह्यात बांधवांनीं पुरून ठेविलीं, व त्या दोन जागा नागांव नांवाच्या अलीबागपासून जवळ असलेल्या एका गांवीं अद्यापहि दाखवितात. यांत शंभर वर्षांपूर्वीं एस्तेर हें नांव नव्हतें म्हणून, एस्तेरचें पुस्तक रचलें जाण्यापूर्वीं हे आले अशी समजूत आहे. वर सांगितलेल्या वांचलेल्या ज्यू स्त्रीपुरूषांची पुढे प्रजा वाढून त्यांनीं कोंकणांतील निरनिराळ्या गांवीं वस्ती केली. या ठिकाणीं ते मुख्यत्वें तेल-घाणे चालवून तिळाचें तेल, पेंड, वगैरे जिन्नस विकण्याचा धंदा करीत. ते शनवार हा धार्मिक विश्रांतीचा दिवस पाळून घाणे बंद ठेवीत, यावरून त्यांनां 'शनवार तेली' असें म्हणत. तेलाचा धंदा त्यांस येत असें याचें कारण देवळास लागणारें तेल उपाध्यायवर्गानें काढावें अशी रीत होती, व बेने-इस्त्रायलांचे पूर्वज उपाध्यायांतले होतें असें म्हणतात. प्राचीन काळीं ईजिप्त, अरबस्तान, इराण वगैरे अनेक देशांतील बंदरांचा मुंबईनजीकच्या चौल बंदराशीं व्यापारी संबंध फार वर्षें होता. या बंदरांचा उल्लेख चेमूल, सिमुल्ला, तिमौला (भूगोलशास्त्रज्ञ टॉलेमी, स. १५०), चेमुला (बौद्ध), चिमोलो (चिनी) सैमूर व जैमूर (अरबी लेखक), वगैरे अनेक नांवांनीं प्राचीन परकीयांनीं केलेंला आढळतो. बेने-इस्त्रायल लोकांचा आपल्या मूळ देशांतील बांधवांशीं चालू असलेला संबंध साफ तुटला. यामुळें पुढें बेने-इस्त्रायल लोक आपली मूळची हिब्रू भाषाहि साफ विसरले. व यांचेच जे बांधव मलबार किना-यावर वसाहत करूंन राहिलेले आहेत. त्यांत काळे व गोरे असें भेद आहेत. त्यांपैकीं काळ्यांची वसाहत जुनी आहे. दोघांची भाषा मल्याळी आहे. गो-या मल्याळींचा पोषाख परकीय आहे. तथापि त्यांनीं देखील मंगलसूत्रयुक्त विवाहाची चाल घेतली आहे. बेने इस्त्रायल ही जात चांगलीं देखणी असून त्यांनीं हिंदु लोकांच्या चालीरीती व पोषाख उचलला आहे. व मराठी हीच त्यांची मातृभाषा बनली आहे. ज्यू हें नांव लावणेंहि ते कमीपणाचें समजत असत; याचें कारण मुसुलमानांच्या जुलमापासून बचाव करणें हें असावें प्राचीन काळीं इराणांतहि एक जो टोळी येमेन प्रांतांत वसाहत करूंन राहिली होती तिच्यापैकींच कांहीं इसम मुंबई किना-यावर लागलें असावे. बेने इस्त्रायल लोकांनीं आपलीं मूळ हिब्रू नांवें थोडा फेरफार करूंन हिंदु बनविलीं आहेत; उदा. बेंजामिनपासून बनाजी; अब्राहामपासून अबाजी; व बायकांच्या नांवापुढें बाई हा शब्द लावून बनवलेलीं साराहबाई, मिरिबाई वगैरे.
अलीकडे बरेच लोक (चार हजारांहून अधिक) मुंबई शहरांत येऊन राहिले आहेत. खेडेगांवांत तेल्याच्या धंद्याशिवाय अलीकडे हे लोक शेतकी, सुतारकी, पाथरवट काम, वगैरे धंदे करतात; शहरांत सरकारी खातीं, रेल्वे, म्युनिसिपालिटी वगैरे ठिकाणीं नोक-या करतात. ईस्टइंडिया कंपनीच्या सैन्यांतहि शिपाईगिरीच्या नोक-या करूंन स्वशौर्यानें वरच्या हुद्यांपर्यंत चढलेले बरेच इसम आढळतात. यांची नीतिमत्ता चांगलीं असून आदर व आतिथ्य हे गुण त्यांच्यांत विशेष आहेत. या जातीच्या बायका शिक्षण घेऊन शिक्षण घेऊन शिक्षकिणी व नर्स झालेंल्या आहेत. सध्यां या जातींत पुरषशिक्षण स्त्रीशिक्षणापेक्षां कमी होत चाललें आहे. भांडखोरपणा व दारूबाजी हे या जातीचे मुख्य दुर्गुण होत.
बेने– इस्त्रायल लोकांचीं जुनीं प्रार्थनामंदिरें कोठें फारशा नाहींत. सर्वांत जुनें मंदिर मुंबई येथें असून त्यावर १७९६ हा सन खोदलेला आहे. गेल्या शंभर वर्षांत मुंबईत चार पांच व इतर निरनिराळीं आठ नऊ मंदिरें त्यांनीं बांधलीं आहेत. अपत्यजन्म, विवाह, मृत्यु, अंगावर येणा-या देवी, वगैरे बाबतींतील कित्येक हिदूंचे धार्मिक विधी खेड्यांतील बेने- इस्त्रायल लोकांनीं विशेषतः बायकांनीं स्वीकारले आहेत. या जातीच्या अन्तर्गत व्यवस्थेंत मुकदम (व्यवस्थापक) व काझी ( न्यायाधीश) असें दोन अधिकारी असतांत. लग्नविधि, र्औघ्वदेहिक वगैरे धार्मिक कृत्यें काझी करतो. सुंता करणें, शनिवार शुभदिन पाळणें, ज्यू लोकांतले उपवास व सण करणें, वगैरे धार्मिक बाबी आहेत. सणांमध्यें दारफळणीचा सण, खिरीचा सण व होळीचा सण, बिद्र्याचा सण, नव्याचा सण, वगैरे मुख्य असून त्यांतील कांहीं हिंदूंचे सण स्वीकारलेले आहेत. हे जुन्या काळी आले असल्यामुळें हे उत्तरकालान ग्रंथ 'तलमुद यास महत्त्व देत नाहींत.
वाड्मय हे लोक दोन हजार वर्षें हिंदुस्थानांत आहेत. पण यांचें जुनें वाड्मय मुळींच नाहीं. साधारणपणें स .१८४२ पूर्वींचा ग्रंथ उपलब्ध नाहीं. त्यानंतर १९ व्या शतकांत बरेच म्हणजे सुमारें २०० ग्रंथ प्रसिद्ध झालें. अलीकडील लेखकांत, एस्. एस्. माजगांवकर, एस्. एस्. आष्टमकर, बी. एस्. आष्टमकर, आय्. एस्. आवाजकर, एस्. ए. भास्तेकर, ए. जे. दिवेकर, डी. एच्. दिवेकर एच् .आय्. गालसूलकर, आय्. एस्. घोसाळकर, एच्. एस्. केहिमकर, डी. एस्. खरीलकर, डॉ. आर. कोरलेकर, एस्. एस्. मजगांवकर, जे .डी. पेणकर, जे. इ. राजपूरकर, इ. जे. तळकर. इ. एस्. वालवटकर वगैरे लेखक असून धर्मविधी, गीतें, चरितें नाटकें वगैरे प्रकारचीं पुस्तकें त्यांनीं लिहिलीं असून ' स्वदेशमित्र हें वृत्तपत्र, इस्त्रायलाक्षम, प्रासंगिक विचार वगैरे मासिकें निघत असत. एक सांप्रदायिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेनेइस्त्रायल लोकांनीं हिंदूंतील ‘किर्तन’ हा धर्मोपदेशाचा प्रकार उचलला असून इस्त्रायल धर्मांतील अनेक पूज्य व्यक्तींवर कविताबद्ध कीर्तनें पुष्कळांनीं तयार केलीं आहेत. नाटककंपन्या काढून स्वतःचीं नाटकें या समाजानें रंगभूमीवर आणलीं आहेत.
(संदर्भग्रंथ – जे. विल्सन-बेने-इस्त्रायल ऑफ बॉम्बे; एच .एस्. केहिमकर स्केच ऑफ दि हिस्टरी ऑफ बेने-इस्त्रायल; जे एच्. लॉर्ड-ज्यूज इन इंडिया अँड फार ईस्ट; बॉम्बे सेन्सस रिपोर्ट; ज्यूईदा इयर बुक ( लंडन) १९०२; १९०३, १९०३-१९०४)