विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेमेतारा– मध्यप्रांतांत द्रुगजिल्ह्यांत उत्तरेकडील तहशील. १९०६ सालीं रायपूर व बिलासपूर जिल्ह्यांतून काढून हा भाग बनविलेला आहे. क्षेत्रफळ १५६६ चौरस मैल असून लोकसंख्या (१९११) सुमारें अडीच लाख होती. एकंदर ८८५ खेडीं आहेत. मुख्य ठिकाण बेमेतारा आहे. हें खेडें द्रुग शहारापासून ४७ मैल आहे याची लोकसंख्या एक हजार आहे.
यांत सहा जमीनदा-यांचाहि समावेश होतो, त्या साहसपूर लोहार, सिल्हट, बरबासपूर, गंडाय, ठाकुरतोळा व मारमोरी. यांचें क्षेत्रफळ ६१४ चौरस मैल असून लोकसंख्या ५८७४२ आहे. जमीनदा-यांपैकीं सरासरी ३०८ चौरस मैल जंगल आहे, परंतु तेथें राखून ठेवलेलीं सरकारी कुरणें नाहींत. पश्चिमेकडील जमीन सुपीक, सपाट व काळी आहे. पूर्वेकडील जमीनदा-यांजवळ सातपुडा पर्वताच्या टेंकड्या आहेत. स. १९०२ – ०३ मध्यें जमीन सा-यांचें उत्पन्न १.९० लाख रूपये होतें.