विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेरड- एक जात. वस्ती मुंबई इलाखा लोकसंख्या (१९११) १८४८७१. बेळगांव, धारवाड व विजापूर या जिल्ह्यांत हे लोक आहेत. बेरड हें एका राष्ट्रजातीचें नांव आहे. हिचे लोक आपल्याला नैकंमाकल्लू असें म्हणवितात. हे लोक मूळचे रामोशी असावे असा अंदाज आहे. बुचॅननच्या मतें बेरड लोक बनवासी कदंब लोक असावे. इतिहास असें सांगतो कीं विजयानगर पडल्यानंतर बेरड लोकांनीं हें शहर लुटलें; व पुढें हैदर अल्लीनें त्यांनां मुसुलमान करूंन आपल्या सैन्यांत घेतलें. निजामाच्या राज्यांतील शोरापूर संस्थानांत ह्या राष्ट्रजातीचें वर्चस्व होतें असें मेडोझ टेलर म्हणतो. इ. स. १६८७ च्या सुमारास या लोकांचा एक पाळेगार सागर येथें राज्य करीत होता त्यावर्षीं मोंगलांची फौज सागर हस्तगत करूंन घेण्याकरितां आली. तेव्हां त्यानें आपण होऊन तो किल्ला मोंगलांच्या स्वाधीन केला. हा पाळेगार पुढें लवकरच मरण पावला. परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पेयनाईक हा सागरजवळ असलेल्या वाकणखेड नांवाच्या घळींत जाऊन राहिला. तेथें त्यानें लुटालूट करूंन पैसा व माणसें जमविली. व २० वर्षांच्या आंतच तो इतका प्रबळ झाला कीं, औरंगझेबाला शेवटीं त्याच्या पारिपत्याचें काम हातीं घेणें भाग पडलें (ग्रँटडफ).
ब्रिटिशसत्तेच्या आंरभीं या लोकांनीं बंडाळी माजविली होती परंतु १८२० सालीं ब्रिटिशांनीं तो मोडली. चोर व लुटारू म्हणून हे लोक असून प्रसिद्ध आहेत. शेतकरी, मजूर व पारधी असें निरनिराळे लोक यांमध्यें आहेत. या लोकांत (१) खास बेरड, (२) दुर्गारमुर्गी, (३) हलगे, (४) जास किंवा म्यास, (५) नेकम्माकल्लू व (६) रामोशी असें विभाग असून एका विभागांतील लोक दुस-या विभागांतील लोकांशीं रोटीबेटी व्यवहार करीत नाहींत. या लोकांत पुष्कळ गोत्र अथवा बेदगू आहेत. विजापुरांतील बेरडांखेरीज इतर बेरड मांसाहारी असून ते गोमांस देखील खातात मुसुलमान लोक यांच्या हातचें जेवण घेत नाहींत. परंतु मुसुलमानांचें जेवण या लोकांनां चालतें. दुर्गा, मल्लिकार्जुन, मारूति, यल्लामा व खंडोबा या देवतांची हे लोक पूजा करतात. यांचे उपध्याग्र ब्राम्हण असतांत. सोलापूरमध्यें बेरड लोक आपले सामाजिक प्रश्न जातीच्या सभेपुढें मांडतात. अपराधाबद्दल दंड व जेवण अशा शिक्षा दिल्या जातात. विजापूरमधील सामाजिक प्रश्नांचा निकाल गुरू करतात.