विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेलफास्ट– आयर्लंड. हें बंदर असून अल्स्टर परगण्याची राजधानी आहे. हल्लीं येथें अल्स्टरच्या स्वतंत्र पार्लमेंटची सभा भरत असतें. लोकसंख्या सुमारें ४ लाख हें आयर्लंडांतील एक मोठें व्यापारी व औद्योगिक शहर असून तागाच्या कापडाच्या व्यापाराचें केंद्रस्थान आहे. येथें सुती कापडाचे व मोठीमोठीं जहाजें बांधण्याचे प्रचंड कारखाने आहेत. आलिंपिया, टिटॅनिक वगैरे प्रचंड बोटी येथेंच बांधल्या गेल्या. येथें औद्योगिक शिक्षणाच्याहि मोठाल्या शाळा आहेत. येथें एक विश्वविद्यालय आहे. येथील टाऊन हॉल ही इमारत फारच प्रेक्षणीय असून इतकी भपकेदार इमारत ग्रेटब्रिटनमध्यें इतर कोठेंहि पाहण्यास मिळत नाहीं.