विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेलफोर्ट- फ्रान्स. बेलफोर्ट प्रांताचे पूर्वईशान्येकडील मुख्य शहर, लोकसंख्या (१९०६) २७८०५. बेलफोर्ट हे प्रिफेक्टच्या राहण्याचें ठिकाण आहे. येथील सार्वजनिक संस्थांत पहिल्या प्रतीच्या न्यायकचे-या, व्यापारी न्यायकचे-या, वणिकसभा, लाइसी व शिक्षक तयार करण्याची शाळा व फ्रान्सच्या पेढीची शाखा वगैरे संस्था आहेत. बाष्पयंत्र व इतर यंत्र तयार करण्याचे कारखाने, कापड तयार करण्याचे कारखाने वगैरे आहेत व लष्करी ठिकाण असल्यामुळें शहरास महत्त्व आलें आहे. १८७० व १८७१ च्या युद्धानंतर बेलफोर्ट हें सरहद्दीचा सर्वांत महत्त्वाचा किल्ला समजला जातें म्हणून ह्या किल्ल्याची अर्वाचीन पद्धतीवर तटबंदी करण्यांत आली आहे.