विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेहिस्तान– इराण. बेहिस्तान अथवा बिस्तन (सध्यां याचा उच्चार बिसुतन असा करतात) हें एक कर्खा नदीला मिळणा-या समास आब नांवाच्या नदीच्या उजव्या तीरावर वसलेलें १७०० फूट उंचीच्या एका उभ्या खडकाच्या पायथ्याशीं खेडें आहे. या नांवाचें जुनें रूप बगिस्तान ईश्रवराचें ठिकाण हें ग्रीक लेखक बिझानियम येथील स्टिफानस व डिओडारेस यांनीं कायम ठेविलें आहे. डिओडोरस म्हणतो कीं, हें ठिकाण झिअस, म्हणजे अहुरमझ्द ( ओर्मजद) याचें पवित्र स्थान मानिलें आहे. याच्या पायथ्याजवळून बाबिलोनिथा (बगदाद) हून मिडियाच्या उंच प्रदेशां (इक्बाताना, हमादन) कडे जाणारा रस्ता जातो. मैदानापासून ५०० फूट उंचीवर खडकाच्या भिंतीसारख्या भागावर इराणचा राजा दरायस (पहिला) यानें एक मोठा कीलाकृति अक्षरांत शिलालेख खोदविला आहे व त्यांत कॅम्बिसेसच्या मरणानंतर त्यानें गौतमाचा ( बळकावून बसणाराचा) कसा खून केला, शेंकडो बंडखोरांचा कसा पराभव केला, व हखामणींचें राज्य कसें परत केलें याचें वर्णन केलें आहे.
१८३५ सालीं सर हेनरी रॉलिन्सन या दुर्गम टेंकड्यावर चढून गेला व त्यानें या शिलालेखांच नकला करूंन त्यांचा अर्थ लाविला. डिओडोरस, शिकंदरच्या स्वा-यांचा इतिहास लिहिणा-या एका ग्रंथकाराच्या आधारावरून म्हणतो कीं, हे शिलालेख सेमिरांमिस राणीचे आहेत. या खडकाच्या पायथ्याशीं शिल्पकामाचे कांहीं अवशिष्ट भाग आहेत; हे अरबी भाषेंत आहेत. येथें पार्थियन राजा गोयर्झेस याचा ग्रीक शिलालेख आहे.