विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेळगामी– बळिगांव. म्हैसूरमध्यें शिमोगा जिल्ह्याच्या शिकारपूर तालुक्यांतील एक खेडें. शिकारपूरच्या वायव्येस १४ मैलावंर उत्तरअक्षांश १ २४’ व पूर्वरेखांश ७५० १५’ मध्यें आहे. खोदीव लेखामध्ये याचें नांव बळिगांवें, बळिग्रामें, बल्लिपूर व इतर अशाच रूपांत आढळतें. बाराव्या शतकांत सुद्धां तें इतकें प्राचीन गणलें जात होतें कीं, त्याला प्राचीन शहरांची माता असें म्हणत असत, व हें नांव बळिनांवाच्या राक्षसापासून आलें आहे असें म्हणतात. त्याच्या धार्मिक महतीमुळें त्याला दक्षिणकेदार म्हणतात. त्याचें नावं कमठ असेंहि होतें. चालुक्यांच्या व कलचुरींच्या वेळीं बनवासी 'द्वादशसाहस्त्री' प्रांताची राजधानी होती. त्यांत विष्णु, शिव, ब्रह्मा, जैन व बुद्ध यांचीं देवळें व मठ होतें, शिवाय सात ब्रह्मापुरीखेरीज आणखी ३ पुरे होतें. सर्व उतारूंनां कोदिया येथील केदारेश्वर देवळाच्या मठांत अन्न व औषध दिलें जातें. तेथील चौ-यायशी खोदीव लेखांपैकीं बहुतेक लेख अकराव्या व बाराव्या शतकांतील आहेत. याची भरभराट होयसळ व सेऊण यांच्या वेळीं चांगलीं होती. परंतु चवदाव्या शतकांत मुसुलमानांनीं स्वारी करूंन होयसळांची सत्ता मोडून टाकली. येथील पडक्या देवळांत कोरीव काम म्हैसूर संस्थानांतील इतर देवळांप्रमाणेंच सुंदर आहे.