विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बैरागी– (संस्कृत वैरागी विरक्त या शब्दापासून) हा प्रथम वैष्णव पंथाच्या (विष्णू, रामकृष्ण यांच्या उपासक) लोकांचा संघ होता. पण आता ती एक जात बनत चालली आहे. बौद्धधर्माचें उच्चाटण झाल्याव ही जात अथवा पंथ उत्पन्न झाला. आजकाल बैरागी या नांवाचा उपयोग कबीरपंथी, सतनामी, स्वामीनारायण या पंथांच्या लोकांसच नव्हे तर ब्राह्मणधर्माहून भिन्न अशा पंथांनांहि होतो. मुळ हा पंथ उत्तरेस गंगातटाकाच्या बाजूस निघाला. दक्षिणेंतहि रामानुजाचार्यामुळें हा पसरला (११ वें शतक). रामानुजी गोसाव्यांत रामानुजांचें पदार्थत्रितयम हें मुख्य तत्त्व आहे. उत्तरेकडेहि रामानंदाने या पंथाचा जास्त प्रसार केला (१४ वें शतक) जे आचारविचार फक्त ब्राह्मण क्षत्रियांनींच पाळावयाचे होतें ते सर्व (शूद्र वगैरे) वर्णांस पाळावयास यानें मोकळीक ठेवल्यानें व संस्कृताऐवजीं हिंदी भाषेंत ग्रंथरचना केल्यानें हा पंथ वाढला. पुढें रामभक्त रामानंदी व कृष्णभक्त निंबानंदी यांच्यांत तेढ उत्पन्न होऊन त्यांचे निरनिराळे पंथ झालें. रामानंदी हे राधेस देव मानीत. बैराग्यांचे चार सांप्रदाय आहेत ते (१) रामानुजी उर्फ रामानंदी उर्फ श्रीवैष्णव, (२) निंबा, नंदी उर्फ निमावत, (३) विष्णुस्वामी किवां वल्लभ, (४) मध्य, बैरागी लोकांत उच्च हिंदूजातींतील कर्जबाजारी, व रिकाम टेकड्या लोकांचा समावेश होतो. पूर्वीं हे लोक ब्रह्मचारी असत पंरतु आतां ते लग्नें करूं लागलें आहेत. बरेच बैरागी मराठ्यांच्या वेळेपासून जमीनदार, जहागीरदार व राजे झालें आहेत. पंजाब, महाराष्ट्र, म्हैसूर, कोचीन वगैरे ठिकाणीं या लोकांची वस्ती आढळतें. सर्वांत जास्त बंगाल व राजपुतान्यांत आहे. एकदंर लोकसंख्या (१९११) साडेसात लाखांवर आहे. पेशवाईंत बैराग्यांची पलटणें होतों व ते सावकारीहि करीत. 'गोसावी पहा' (ग्रोज मथुरा; भट्टाचार्य हिंदु कास्टस अँड सेक्टस कुक निरनिराळ्या प्रांतांचे सेन्सस रिपोर्ट)