विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बैरूट– सारिया प्रांतांतील एक जिल्हा व या जिल्ह्याचें मुख्य शहर. बैरूट हें एक महत्त्वाचें बंदर आहे. लोक संख्या अजमासें ५० हजार आहे. जुने बेरिटस शहर हें फिनिशियन किना-यावरील एक महत्त्वाचें ठाणें होतें. अँटिओकसच्या विरूद्ध लढत असतांना ट्रायफननें ख्रिस्ती शकापूर्वीं १४० व्या वर्षीं ह्या शहाराचा नाश केला होता. नंतर हें शहर रोमन लोकांच्या ताब्यांत गेलें. चवथ्या शतकापासून हें कायद्याच्या शाळाबद्दल प्रसिद्ध आहे. ६३५ सालीं तें अरब लोकांनीं घेतलें. ११११ सालीं तें बाल्डपिननें सर केलें, सलद्दीननें ११८७ सालीं घेतलें व त्यानंतर साडेसहा शतकेपर्यंत तें लेबानानच्या ड्ररूज अमीरांच्या ताब्यांत होतें. ह्या अमीरांपैकीं दुसरा फुक्रुद्दीनमान यानें सतराव्या शतकांत ह्या शहाराची तटबंदी केली. १७६३ सालीं पुन्हां तुर्कांनीं हें शहर काबीज केलें. जेझर व अबदुल्ला पाशा यांनीं एकर येथें बंड उभारलें तेव्हां या शहराच्या मालकीबद्दल ड्रूज, तुर्क व पाशा यांमध्यें लढा सुरू झाला. हा लढा इब्राहिमनें १८३२ सालीं एकर घेतलें तेव्हां मिटला. इब्राहिमनें डज लोकांच्या सत्तेला आळा घालण्यासाठीं हें शहर ताब्यांत ठेविलें; परंतु अँडमिरल सर रॉबर्ट स्टाकर्डनें (१७६८-१८४७) तोफा डागून इब्राहिमास हांकून लाविलें. हें शहर दक्षिण सीरियांतील व्यापाराचें एक केंद्र आहे. १८९४ सालीं एका फ्रेंच कंपनीनें येथें बंदर बांधलें. या शहरांत अमेरिकन व यूरोपियन संस्था पुष्कळ आहेत. अमेरिकन सीरियन व स्कॉटिश मिशनरी लोकांच्या शाळा, विद्यालयें , छापखाने, व त्याचप्रमाणें जर्मन व फ्रेंच रूग्णालयें; अनाथाश्रम इत्यादि ब-याच लोकोपयोगी संस्था आहेत. परंतु रस्ते चांगल्या रीतीनें तयार केलेंलें नाहींत. अमेरिकन व जेसुइट अशीं दोन विश्वविद्यालयें येथें आहेत. प्रवासी लोकांसाठीं पुष्कळ सुंदर खाणावळी आहेत (सीरिया पहा)