विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोडो– तिबेटी- ब्रह्मी भाषेच्या उपभाषा बोलणा-या लोकांनां सर्वसाधारण बोडो या नांवानें ओळखतात. मानववंशशास्त्रदृष्ट्या खरे बोडो लोक असाम प्रांत, कुचबिहार, उत्तरबंगाल व सुरमा नदीची थडी या प्रदेशांत रहातात. काहींच्या मतें हे मूळच्या चांडाळ किंवा नामशूद्र जातींपैकीं असावेत. परंतु सांप्रत त्यांची रहागी सुधारल्यानें त्यांच्या सोयरिकी अहोम जातीशीं होऊं शंकतात. तथापि द-याखो-यांतील व जंगलांतील बोडो लोकांत त्यांच्या पूर्वींच्या वन्य समाजचाली व समजुती चालू आहेत. बंगाली लोक त्यांनां अजूनहि म्लेंच्छ असें म्हणतात. आणि बोडोंचा पेहराव व अंगलोट सुद्धां अद्याप मोंगोलियन धर्तीचीं दिसून येतात. इंग्रज लोक या बोडोंनां साधे कवारी असें म्हणतात. बोडो लोक आपणां स्वतःस 'बोरोनी फिसा' (बोरोचीं म्हणजे माणसाचीं मुलें) म्हणवितात. यांच्यापैकीं ३ लक्ष लोक अद्यापि अहिदुं आहेत. बोडोसारखेंच राभा, दीमासा (प्राचीन हिडिंबा), हाजो, लालंग, गारो, टिप्पेरा, मोरान चुटिया, या जाती बोडो भाषा बोलणा-या पण जास्त सुधारलेल्या आहेत. दीमासा लोकांचें एक स्वतंत्र राज्य दिमापूर, मैबं व खासपूर (काचर) येथें होतें. तें अहोम लोकांनीं बुडविलें. या सर्व जातींबद्दल प्राचीन माहिती फारच थोडीं आढळतें. बोडो लोक २ हजार वर्षांपूर्वीं सर्व आसाम प्रांतांत पसरले होतें असें त्या भागांतील नद्यांच्या (बोडो) नांवांवरून म्हणतां येतें. गेल्या ५० वर्षांत या लोकांत थोडीं थोडीं सुधारणा होऊं लागली असून, त्यांच्यांपैकीं पुष्कळसे लोक अमेरिकन मिशन-यांनीं बाटवून ख्रिस्ती केलें आहते. हिंदु बोडो लोक धर्मभोळे, जादू टोण्यांवर व भुतांखेतांवर विश्वास ठेवणारे आहते. ब-याच वर्षांपूर्वीं ते नरबली देत असत. सांप्रत त्यांच्यांत हिंदु देवता (विशेषतःकुवेर) शिरल्या आहेत. त्यांच्यापैकीं कांहीं कुळ्या आपल्यास वाघपुत्र (मोमा आरूई) म्हणवितात व आपल्या वसतीजवळ जर एज्ञादा वाघ मारला गेला तर त्याचें एक दिवस सुतक पाळून उपावास करतात. यांच्यांत देवळें आहेत. पूर्वीं यांच्यांत मुली पळवन नेऊन लग्रें लागत असत. सध्यां मुलीच्या बापास हुंडा देऊन अथवा जांवयानें सास-याच्या घरीं नोकरी करूंन मुलगी मिळवितात. यांच्यांत उपाध्याय नाहींत, मंत्रतंत्राचें काम बायका (देवॠषीण) करतात. यांच्यांत सात व पांच संख्येचें महत्त्व आहे. मुलीची नाळ ७ ठिकाणीं कापतात तर मुलाची नाळ ५ निरनिराळ्या चाकूंनीं कापतात. प्रेताच्या तोंडांत एक बांबूची पोकळ नळी ठेवतात. त्यांतून त्याचा जीव परलोकीं जातो असें मानितात. सांप्रत हे लोक शेती करतात. यांच्यांत पूर्वीं मातृकन्या वारसाची पद्धति होती आतां ती नाहींशी होत चालली आहे.( हॉडसन कोच, बोडो ट्राईब्ज; एंडल कचारीज; पेफेअर गारो; गेट कोच)